जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:20 AM2021-03-05T04:20:25+5:302021-03-05T04:20:25+5:30
अहमदनगर : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत थेट मुंबई गाठली ...
अहमदनगर : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत थेट मुंबई गाठली आहे. मंत्र्यांची भेट घेऊन आपले नाव पुढे सरकावण्याचा प्रयत्न सुरू आहेत. परंतु, यावेळी बँकेत खमकी भूमिका घेणाऱ्याला संधी देण्याच्या निर्णयपर्यंत सर्वच श्रेष्ठी आल्याने काहींची अडचण झाल्याने अध्यक्षपदाचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी येत्या शनिवारी संचालक मंडळाची सभा बोलविण्यात आली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची वेळ जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी संचालकांची धाकधूक वाढत आहे. अध्यक्ष ठरविणारे मंत्री सध्या अधिवेशानच्या निमित्ताने मुंबईत मुक्कामी आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुखमंत्र्यांची विरोधकांनी चांगलीच कोंडी केल्याने ते व्यस्त आहेत. मंत्रालयालयातील वातावरणही यामुळे तापले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेचा विषय त्यांच्यासमोर मांडायचा कुणी? असा प्रश्न आहे. इच्छुकांनी मुंबई गाठली खरी, पण बँकेबाबत कुणी? चकार शब्दही काढायला तयार नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव भांड्यात पडल आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाबाबत मंत्र्यांची बैठक होईल, असे सुरुवातीला सांगितले जात होते. पण, मंत्रालयातील गरमागरमी पाहता बैठक न घेता श्रेष्ठींकडून बंद पाकिटातून नावे सुचविले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहुल जगताप यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय आणखी एक भानुसादास मुरकुटे यांच्याही नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची मध्यंतरी भेट घेतल्याचीही चर्चा आहे. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून माधवराव कानवडे यांचे नाव पुढे केले जात आहे. माजी आमदार घुले यांच्यासाठी त्यांचे थोरले बंधू नरेंद्र घुले हे प्रयत्न करत आहेत. त्यांनी बँकेच्या संचालकांची भेटी घेऊन लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वत: चंद्रशेखर घुले हेही मुंंबईत तळ ठोकून आहेत. श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप हेही जोरकसपणे मागणी करत आहेत. त्यांनीही श्रेष्ठींकडे अध्यक्ष पदासाठी संधी देण्याचा अग्रह धरला आहे. अध्यक्षपदासाठी घुले व जगताप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये घुले यांचे पारडे जड असून, जगताप यांच्या श्रीगोंदा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार दत्ता पानसरे यांना जास्त मते मिळालेली आहेत. त्यामुळे जगताप यांचे नाव एनवेळी मागे पडून घुले यांच्या नावावर शिक्कात मोर्तब हऊ शकतो, असे काहींचे म्हणने आहे. परंतु, जिल्हा बँकेच्या कारभाराला शिस्त लावणारा खमका अध्यक्ष देण्यावर श्रेष्ठींचा भर आहे. श्रेष्ठींच्या या निकषात घुले बसतात का? असा काहींचा प्रश्न आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा गुंता आणखी वाढला असून, श्रेष्ठींकडून अनपेक्षित होऊ शकतो, असा एक मत प्रवाह आहे.
....
विखे, कर्डिले गटातही शांतात
जिल्हा बँकेच्या राजकारणात माजीमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे या विखे पिता-पुत्रांची भूमिका यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची राहिलेली आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी, तर निवडणुकीनंतर साखर सम्राटांवर जोरदार टीका केली. परंतु, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड तोंडावर आली असता हे दोन्ही नेते मौन बाळगून आहेत. त्यामुळे विखे, कर्डिले गटात असलेली स्मशान शांततेतही सध्या जिल्ह्यातील चर्चेचा विषय ठरला आहे.