राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये; श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, अकोले, कोपरगावात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:11 PM2018-02-12T13:11:20+5:302018-02-12T13:18:51+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात सुरू करण्यात आलेली हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये येत आहे. श्रीगोंदा येथून उत्तर विभागाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे़ श्रीगोंदा येथून शेवगाव, राहुरी, अकोले आणि कोपरगाव तालुक्यांत सभा होईल.

NCP's attack rally in city on Thursdays; Meeting in Shrigonda, Chevgaon, Rahuri, Akole, Kopargaon | राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये; श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, अकोले, कोपरगावात सभा

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये; श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, अकोले, कोपरगावात सभा

ठळक मुद्देतनपुरे, काळे, जगताप, पिचड, ढाकणे मैदानातश्रीगोंद्यात बड्या नेत्यांच्या प्रवेशाची चर्चानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातून नगर जिल्ह्यातील हल्लाबोल यात्रेला गुरुवारी सुरुवात होईल.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात सुरू करण्यात आलेली हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये येत आहे. श्रीगोंदा येथून उत्तर विभागाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. श्रीगोंदा येथून शेवगाव, राहुरी, अकोले आणि कोपरगाव तालुक्यांत सभा होईल, अशी महिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
विविध मागण्यांसाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन हाती घेण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातून ही यात्रा कोपरगावमार्गे नाशिक जिल्ह्यात जाणार आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातून नगर जिल्ह्यातील हल्लाबोल यात्रेला गुरुवारी सुरुवात होईल. तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. निवेदनानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे.
गुरुवारी श्रीगोंद्यासह शेवगाव आणि राहुरी शहरात मोर्चा काढून सभा घेण्यात येणार आहे. राहुरी येथे सायंकाळी साडेसात वाजता सभा होणार असून, शिर्डी येथे मुक्काम असणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार असून, कोपरगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी ४ वाजता सभा होणार आहे. कोपरगावमार्गे यात्रा नाशिकडे रवाना होणार असल्याचे घुले म्हणाले. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, सरचिटणीस सोमनाथ धूत आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा विभाजनाबाबत घुलेंची सावध भूमिका

पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना घुले म्हणाले, जिल्हा विभाजनाचा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे़ जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय सरकारच्या अखत्यारित आहे. पक्षाची बांधणी सुरू आहे. जुन्या नेत्यांना सोबत घेण्याबाबतचा निर्णय श्रेष्ठी घेतील. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, त्यानुसार रणनीती ठरविली जाईल.

तनपुरे, काळे, जगताप, पिचड, ढाकणे मैदानात

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सक्रिय झाले आहेत. श्रीगोंद्यात आमदार राहुल जगताप, शेवगावमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले, नेवासा तालुक्यात विठ्ठलराव लंघे, श्रीरामपूरमध्ये अविनाश आदिक, राहुरीत प्राजक्ता तनपुरे, कोपरगावमध्ये आशुतोष काळे, अकोल्यात माजी मंत्री मधुकरराव पिचड हल्लाबोलच्या तयारी लागले आहेत. नगर शहरात आंदोलन नाही़ पण, आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे़ राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदारही हल्लाबोलच्या निमित्ताने सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

श्रीगोंद्यात बड्या नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा

उत्तर महाराष्ट्राच्या हल्लाबोल यात्रेची सुरुवात श्रीगोंद्यातून होत आहे. श्रीगोंदा तालुक्यात आंदोलनाची तयारी सुरू आहे. आंदोलनाच्या वेळी श्रीगोंदा तालुक्यातील दोन बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या श्रीगोंद्यात आहे. त्यांना सोबत घेऊन तालुक्यातील विरोधकांवर हल्लाबोल करण्याची तयारी जगताप यांनी सुरू केल्याचेही बोलले जात आहे.

 

Web Title: NCP's attack rally in city on Thursdays; Meeting in Shrigonda, Chevgaon, Rahuri, Akole, Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.