राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशाला नगरसेवकांचा चकवा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:38+5:302021-09-22T04:24:38+5:30
शहरातील काँग्रेस भवन येथे नगराध्यक्षा आदिक यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात राष्ट्रवादीचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे मुक्तार शाह, प्रकाश ...
शहरातील काँग्रेस भवन येथे नगराध्यक्षा आदिक यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात राष्ट्रवादीचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे मुक्तार शाह, प्रकाश ढोकणे, नगरसेविका चंद्रकला डोळस यांचे पती भाऊसाहेब यांची सोहळ्याला उपस्थिती होती. मात्र, त्यांचा यावेळी प्रवेश झाला नाही. नगराध्यक्षा आदिक यांच्या मुंबई दौऱ्यात सहभागी झालेल्या भाजप नगरसेवकांनी सोहळ्याला मात्र पाठ फिरविली.
पालिकेत नगराध्यक्षा आदिक यांनी विरोधी करण ससाणे यांच्या गटाला शह देण्यात मोठे यश मिळविले होते. काँग्रेसच्या एका गटाला आपल्या बाजूने त्यांनी खेचले. मात्र, या नगरसेवकांनी अद्यापही त्यांचा पक्ष सोडलेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनाही आदिक यांनी गळाला लावले. मात्र, तेदेखील त्यांच्याच पक्षात कायम राहिले आहेत.
पक्षाच्या प्रवेश सोहळ्यात यातील काही नगरसेवक राष्ट्रवादीचे उपरणे गळ्यात टाकतील, अशी चर्चा होती. त्यातून राष्ट्रवादीला व पर्यायाने अनुराधा आदिक यांना बळ मिळेल अशी शक्यता होती. मात्र, तसे काहीही घडले नाही.
शहरातील दुसऱ्या फळीतील काही कार्यकर्ते व खानापूर तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. श्रीरामपूर मतदारसंघातील राहुरीतील ३२ गावांतील काही कार्यकर्त्यांनीही यावेळी घड्याळ हाती घेतले. मात्र, इतर पक्षांतील नगरसेवकांचा पक्ष प्रवेश करण्यात यश आले नाही. याउलट राष्ट्रवादीचेच दोन नगरसेवक मात्र यावेळी गैरहजर राहिले.
याचाच अर्थ अद्यापही अनेक नगरसेवक ‘वेट ॲण्ड वॉच’च्या मनस्थितीत आहेत. पालिकेचा कार्यकाळ २८ डिसेंबरला संपत आहे. निवडणुका मुदतीत होणार याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे ऐनवेळीच नगरसेवक आपले पत्ते उघडतील, अशी शक्यता आहे.
---------
यांची भूमिका गुलदस्त्यात
दीपक चव्हाण
वैशाली चव्हाण
रवी पाटील
(सर्व भाजप)
चंद्रकला डोळस
मुक्तार शाह
प्रकाश ढोकणे
(काँग्रेस)
------
राष्ट्रवादीचे गैरहजर नगरसेवक
शीतल गवारे
स्नेहल खोरे
--------
भूमिकेकडे लक्ष
संतोष कांबळे
(काँग्रेस)
---------
नगराध्यक्षा आदिक यांनी माझ्या भागामध्ये मोठी विकासकामे केली आहेत. आजवर कधीही झाली नाहीत अशी कामे त्यांनी केली. त्यामुळे मी निश्चितच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. तो पक्ष प्रवेश अधिक मोठा राहील.
- प्रकाश ढोकणे, काँग्रेस नगरसेवक.
--------