राष्ट्रवादीचा जाहीरनामा अजून छापखान्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:22 PM2018-12-06T12:22:32+5:302018-12-06T12:22:35+5:30
विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजून छापखान्यातच असल्याचे उघड झाले़ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांनी तशी कबुली बुधवारी पत्रकार परिषदेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर दिली.
अहमदनगर : विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजून छापखान्यातच असल्याचे उघड झाले़ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांनी तशी कबुली बुधवारी पत्रकार परिषदेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी निवडणुकीचा जाहीरनामा कधी प्रसिध्द करणार, याबाबत विचारले असता जाहीरनामा तयार करायला टाकला आहे़ तो मिळाल्यानंतर तातडीने जाहीर करणार असल्याचे उत्तर कळमकर यांनी दिले़ महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे दोन दिवस उरले आहेत. मात्र, पक्षाचा जाहीरनामाच अजून छापलेला नाही. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवत आहोत, असा राष्टÑवादीचा दावा आहे. ‘नको विकासाच्या गप्पा’ असे त्यांचे फलक शहरात झळकत आहेत. मात्र, पक्षाने स्वत:चा जाहीरनामा घोषित केला नाही. सेना व भाजपाच्या नेत्यांच्या सभा झाल्या़ मात्र राष्ट्रवादीचा एकही नेता नगरकडे फिरकला नाही़ पक्षाने ही निवडणूक सोडली आहे का? या पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वळसे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सक्षम आहेत़ त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची आवश्यकता नाही’. अंकुश काकडे वगळता एकही पक्षाचा नेता नगरकडे फिरकला नाही.
वळसे यांचे वरातीमागून घोडे
राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी प्रचाराच्या कामाला लागले आहेत़ त्यांनी शहर पिंजून काढले असून, प्रचारात ते सक्रिय आहे़त. प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना राष्ट्रवादी पक्षाच्या ग्रामीण भागातील पदाधिकाºयांना सक्रिय होण्याचा आदेश वळसे यांनी दिला आहे़ वळसे यांनी बुधवारी केवळ पत्रकार परिषद घेतली. त्यांच्याही सभा अजून झालेल्या नाहीत.