राष्ट्रवादीच्या जेवणावळीवर पथकाचा छापा : निवडणूक सनियंत्रण पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:34 AM2018-12-06T11:34:23+5:302018-12-06T11:34:48+5:30
सारसनगर येथील सर्वमंगल मंगल कार्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जेवणावळीवर निवडणूक सनियंत्रण पथकाने छापा टाकला.
अहमदनगर : सारसनगर येथील सर्वमंगल मंगल कार्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जेवणावळीवर निवडणूक सनियंत्रण पथकाने छापा टाकला. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात संबंधित उमेदवार व पक्षाला नोटीस बजावून खुलासा मागण्यात येणार आहे. अन्यथा हा खर्च निवडणूक खर्चाच्या हिशोबात समाविष्ट करण्यात येईल, अशी माहिती पथकप्रमुखांनी दिली.
महापालिका निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे, उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवणे यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीअंतर्गत असलेले पथक शहरात फिरून निवडणूक काळात आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे.
बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सारसनगर येथील सर्वमंगल मंगल कार्यालयात राष्ट्रवादीतर्फे मतदारांसाठी जेवणावळ सुरू असल्याची माहिती या पथकाला समजली. त्यानुसार पथकातील अधिकारी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी प्राजित नायर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे सुमारे २५० ते ३०० लोक जेवण करताना आढळले. पथकाने त्वरित ही जेवणावळ थांबवून आयोजकांसमवेत पंचनामा केला. एकाच वेळी एवढ्या लोकांना जेवण कशासाठी देण्यात आले? अशी नोटीस पक्षासह संबंधित उमेदवारांना बजावण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान, ही कारवाई सारसनगर परिसरात चर्चेचा विषय ठरली. अशा कारवायांमुळे शहरातील अनेक हॉटेलांमध्ये सुरू असलेली अवैध मद्यविक्री, तसेच कार्यकर्त्यांच्या जेवणावळी पथकाच्या रडारवर आल्या आहेत. ही कारवाई राष्टÑवादीसाठी धक्का मानली जाते.