राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार मतांनी विजयी, राठोड पुन्हा पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 14:52 IST2019-10-24T14:51:11+5:302019-10-24T14:52:28+5:30
अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप २१ व्या फेरीनंतर ११ हजार ११५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला.जगताप हे दुस-यांदा आमदार झाले आहेत.

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार मतांनी विजयी, राठोड पुन्हा पराभूत
अहमदनगर : अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप २१ व्या फेरीनंतर ११ हजार ११५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला.जगताप हे दुस-यांदा आमदार झाले आहेत.
सकाळी मतमोजणी सुरू झाली, त्यावेळी पहिल्या फेरीपासूनच जगताप आघाडीवर होते. सहाशे मतांपासून सुरू झालेली त्यांची आघाडी दहा हजारापर्यंत पोहोचली होती. मध्य शहरातील मतमोजणी सुरू झाली त्यावेळी जगताप यांची आघाडी तब्बल पाच हजार मतांनी घटली होती.मात्र सारसनगर, केडगाव, रेल्वे स्टेशन रोड भागात जगताप यांना निर्णायक मताधिक्य मिळाले. जगताप यांना ११ हजार ११५ मतांची आघाडी मिळाली आहे.
जगताप यांच्याविरुद्ध राठोड हे दुस-यांदा मैदानात होते. राठोड यांचा सलग दुस-यांदा पराभव झाला. जगताप यांनी केलेली मोर्चेबांधणी, प्रचारासाठी घेतलेली मेहनत आणि तरुणांमध्ये केलेला संपर्क यामुळे जगताप हे विजयापर्यंत पोहोचले.