राहुरीत हुमणीबाधीत ऊसासह राष्ट्रवादीचा तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 05:16 PM2018-10-16T17:16:53+5:302018-10-16T17:16:57+5:30
हुमणी बाधीत ऊसासह राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कचेरीवर शासनाच्या विरोधी मोर्चा काढण्यात आला.
राहुरी : हुमणी बाधीत ऊसासह राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कचेरीवर शासनाच्या विरोधी मोर्चा काढण्यात आला. आठ दिवसात पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला़ मोर्चाच्या वतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले.
राहुरी येथील शनि मंदीरपासून मोर्चाला घोषणा देत मोर्चा काढण्यात आला़ हुमणीग्रस्त ऊस हातात घेत शेतक-यांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या़ राहुरी तहसील कार्यालयासमोर आलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ सभेत बोलतांना नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी शासनाच्या धोरणावर टिका केली़ बोंडअळीची रक्कम मिळाली नाही तर दुस-या बाजुला शेतक-यांना दुधाचे अनुदान मिळाले नाही़ शासन शेतक-यांच्या विरोधी असून त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल़
मुळा धरणातुन जायकवाडीला पाणी सोडण्यास नगराध्यक्ष तीव्र विरोध दर्शविला़ वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढू व आंदोलन छेडू पण डाव होणून पाडू असा इशारा दिला़ जायकवाडी पाणी जाऊ देणार अशी घोषणा करणारे आमदार शिवाजी कर्डीले गप्प का असा सवाल तनपुरे यांनी उपस्थित केला़ २०३० सालापर्यंत आमदारकीची स्वप्ने पाहाणा-या लोकप्रतिनिधीला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असेही तनपुरे यांनी सांगितले़ राहुरी तालुक्यात तयार करण्यात आलेले रस्ते निकृष्ट प्रतिचे असल्याची टिकाही तनपुरे यांनी केली़
मोर्चासमोर मुळा प्रवरा इलेक्ट्रीक सोसायटीचे संचालक शिवाजी सागर, शिवाजी कातोरे, रियाज देशमुख, विक्रम गाढे यांची भाषणे झाली़ यावेळी सभापती मनिषा ओहोळ, मधुकर तारडे, रविंद्र आढाव, शिवाजी डौले, प्रकाश भुजाडी, धिरज पानसंबळ, पांडुरंग उदावंत, अनिल कासार, नगरसेवक भिकुशेठ भुजाडी, राजेंद्र बोरकर, शरद धसाळ, सचिन भिंगारदे आदी उपस्थित होते.