शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:41+5:302021-01-20T04:21:41+5:30
शेवगाव : तालुक्याच्या ४८ ग्रामपंचायत निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. अनेक ठिकाणी सत्ताधा-यांना पराभव पत्करावा लागला ...
शेवगाव : तालुक्याच्या ४८ ग्रामपंचायत निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. अनेक ठिकाणी सत्ताधा-यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या गावच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.
४७ पैकी राष्ट्रवादी पक्षाला २०, स्थानिक आघाडी १७, भाजपा १० व शिवसेनेच्या ताब्यात १ ग्रामपंचायत आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित आघाडी, सावली दिव्यांग संघटना यांना खाते खोलण्याची संधी मिळाली आहे. अनेक गावात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या स्थानिक विकास आघाडीने विजय संपादन केल्याने पक्षाच्या बहुमतास बाधा निर्माण झाली.
या निवडणूक निकालात भाविनिमगाव, बक्तरपूर, पिंगेवाडी, कोनोशी, आंतरवाली येथे राष्ट्रवादीच्या संपूर्ण जागा निवडून आल्या आहेत. निंबेनांदुर, मजलेशहर, लखमापुरी, सुकळी, अधोडी, खुंटेफळ, गायकवाड जळगाव, भातकुडगांव, आंतरवाली खुर्द, चेडे चांदगाव, आखतवाडे, गदेवाडी, हातगाव, ढोरजळगाव-शे, पिंगेवाडी, सोनेसांगवी, वरखेड येथे राष्ट्रवादी पक्षाला बहूमत मिळाले आहे. यात काही ठिकाणी राष्ट्रवादीला वंचित आघाडी, स्वाभीमानी शेतकरी संघटना, दिव्यांग संघटना यांच्या मदतीसह भाजपाचेही सहकार्य मिळाले.
भाजपाच्या कोळगाव, ढोरजळगांव-ने या दोनच ठिकाणी संपूर्ण जागा निवडून आल्या आहेत. ठाकूर पिंपळगांव, शकटे बुद्रुक, दादेगाव, नविन दहिफळ, आंतरवाली बुद्रुक, ठाकूर निमगाव, नजीक बाभुळगाव येथे भाजपाला बहुमत मिळाले आहे. ढोरजळगावने येथील भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गणेश कराड व अंनता उकिर्डे यांच्या नेतृत्वाखाली आठ महिला निवडून आल्याने सत्तेची दोरी महिलांच्या हाती आली आहे. शिंगोरी येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. हसनापूर, सोनविहीर, बोडखे, ताजनापूर, कांबी, वाडगाव, नागलवाडी, जुने दहिफळ, राणेगांव, तळणी, दहिगावशे, आव्हाणे खुर्द, बेलगांव, चापडगांव, घोटण, मळेगावशे, बाभुळगांव, राक्षी या ठिकाणी स्थापन केलेल्या स्थानिक विकास आघाडीने विजय संपादन केले आहे. आघाडीत इतर पक्षांचेही सहकार्य असल्याने अपवाद वगळता एका ठरावीक पक्षास बहुमताचा दावा करता आला नाही.
आखतवाडे येथे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे यांच्या पत्नी वर्षा सोनवणे व वाडगाव विद्यमान सरपंच सुनिता जवरे, भातुकडगावचे सरपंच राजेश फटागंरे, ठाकूर निमगावचे सरपंच गहिनीनाथ कातकडे यांचा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.