केडगावात २०० बेड्सच्या कोविड सेंटरची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:01+5:302021-04-05T04:19:01+5:30
योगेश गुंड केडगाव : केडगावमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आतापर्यंत येथील पाच भाग ...
योगेश गुंड
केडगाव : केडगावमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आतापर्यंत येथील पाच भाग कंटेन्मेंट करण्यात आले आहेत. केडगावमध्ये कोविड सेंटरच नसल्याने खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. गोरगरिबांना हे दर परवडत नसल्याने त्यांची हेळसांड सुरू आहे.
कोरोनाचा दुसरा टप्पा केडगावकरांसाठी चांगलाच घातक ठरत आहे. कोरोनाने अनेकांचा जीव घेतल्याने केडगावमध्ये मध्यंतरी पाच भागांत कंटेन्मेंट भाग म्हणून घोषित करण्यात आले . मात्र कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. गेल्या काही दिवसांत केडगावमधील जवळपास ५०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली असून, सध्या २००च्या वर सक्रिय रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. केडगावमधील खासगी दवाखाने कोरोना बाधितांनी हाऊसफुल्ल झाल्याने बरेचसे रुग्ण आता शहरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत केडगावमध्ये २०० बेड्सची क्षमता असणारे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नगर-पुणे रस्त्यावरील डॉन बॉस्को संस्थेने सध्या कोविड सेंटर सुरू केले आहे. तेथे ६० बेस्सची क्षमता असली तरी त्या ठिकाणी केडगाव ऐवजी बाहेरील रुग्ण जास्त आहेत तेथे स्थानिकांना समाविष्ट करून घेण्याची मागणी होत आहे.
केडगाव आरोग्य केंद्रात आतापर्यंत ६ हजार ३०० लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच रोजच्या आरटीपीसीआरच्या १०० व अँटिजनच्या १५० अशा रोज २५० कोरोनाच्या तपासण्या होत असून, यातून रोजचे ५०च्या वर बाधित रुग्ण निघत आहेत. सध्या केडगावमधील जुने गाव, पाटील कॉलनी, सोनेवाडीरोड, शाहूनगर या भागात रुग्णांची संख्या जास्त असल्याने या भागातील दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले आहेत.
----------------------
आयुक्त, उपायुक्तांनी दिली भेट
महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे यांनी शनिवारी रात्री १० वाजता केडगाव येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉन बॉस्को येथील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीची त्यांनी पाहणी करून काही सूचना केल्या.
---------------------
केडगावची सद्य:स्थिती
कुण रुग्ण - ५०० पेक्षा जास्त
सक्रिय रुग्ण - २००
रोजच्या तपासण्या - २५०
रोजच्या बाधितांची संख्या -सरासरी ५०
आतापर्यंतचे लसीकरण -६३००
फोटो -०४ केडगाव
ओळी- केडगावमधील डॉन बॉस्को येथील कोविड सेंटरची पाहणी करताना आयुक्त व उपायुक्त.