अकोलेत पर्यावरणपूरक पर्यटन विकासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 04:49 PM2019-06-05T16:49:37+5:302019-06-05T16:49:53+5:30

जैवविविधतेचे लेणे व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या अकोले तालुक्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून कात टाकली आहे.

The need for eco-tourism tourism development in Akole | अकोलेत पर्यावरणपूरक पर्यटन विकासाची गरज

अकोलेत पर्यावरणपूरक पर्यटन विकासाची गरज

हेमंत आवारी
अकोले : जैवविविधतेचे लेणे व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या अकोले तालुक्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून कात टाकली आहे. यातून पर्यटन विकासाला चालना मिळत आहे. आदिवासींचा आर्थिकस्तर उंचावण्यास हातभार लागत आहे. दरम्यान पर्यावरणपूरक पर्यटन विकास करण्याची गरज आहे. यासाठी हौशी पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळून निसर्गाची हानी टाळावी, असे निसर्गप्रेमींना वाटते. शिखरस्वामिनी कळसूबाई, रामायणाची साक्ष असलेला आज्यापर्वत, लव-कुश यांचे जन्मस्थळ असलेला कोदनी येथील वाल्मिकऋषींचा तातोबागड, अगस्तीऋषी आश्रम, २६ गड किल्ले, हरिश्चंद्रगड, रतनगड, बित्तमगड, पट्टाकिल्ला, आंबित व्हॅली, कोंबड किल्ला, भैरवगड, दुर्गम फोफसंडी-बिताका आदिवासी पारंपरिक लोककला जतन करणारी खेडी, वनौषधी, रानपक्षी, रानफुल, वन्यजीव जंगल अन् शेखरु, बिबट्या तसेच ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण ही पर्यटनाची बलस्थाने आहेत. आता निळवंडे धरणाची त्यात भर पडली आहे. अकोले तालुका जैवविविधतेसाठी ‘हॉट स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. जंगलात हिरडा, बेहडा, खैर, सादडा, करंज, बांबू, कारवी, आंबा, काजू, फणस, करवंद झाडे दिसतात. खोकर, भेकर, रानमांजर, लांडगा, तरस, साळींदर, रानडुक्कर आदी जंगली प्राणी आढळतात. कोथळे, तोलारखिंड, हरिश्चंद्र रानात राष्ट्रीय पक्षी शेखरू दिसतोच. विश्रामगड परिसरात गिधड, घार, घुबड, वेडा राघू आकाशात घिरट्या घालतात. वाशेरे घाटात मोर फेर धरताना दिसतात. ६२९ वनस्पती, ५१२ रानफुल तर १५७ प्रकारचे पक्षी तालुक्यात असल्याने निर्सगप्रेमींचा सतस राबता आहे. प्रत्येक ऋतूत वेगळेपण दडलेले असून निसर्ग पर्यटन वृध्दिंगत होत आहे. दरम्यान भंडारदरा परिसरात काजवा महोत्सवासाठी आलेल्या पर्यटक साम्रद येथील गूढरम्य सांदन दरीची सफर करण्याचा आनंद घेतात. दरवर्षी मान्सूनच्या आगमनाची अवंता देत भंडारदरा परिसर लक्ष लक्ष काजव्यांच्या प्रकाश फुलांनी उजळून निघतो. दिवसभर सांदन दरीची सफर करायची. रात्री काजवे पाहण्याचा आनंद द्विगुणीत करतात.

शेकरु दुर्मिळ; बिबटे बागायती क्षेत्राकडे
दुर्मिळ होत चालेला ‘शेकरु’ या प्राण्याची संख्या तालुक्यातील हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्यात कोथळ्याच्या रानात पाचपटीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. अभयारण्य क्षेत्रात केवळ नऊ ‘बिबटे’आढळल्याने जंगलातील बिबट्यांनी आपला मुक्काम बागायती ऊस क्षेत्राकडे वळविला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्यक्षेत्रात वानर, माकड व रानडुक्कर यांच्यासह पक्ष्यांची संख्या वाढलेली आहे. तर चिमणी- कावळ्यांची संख्या कमालीची घटली आहे. राष्ट्रीय पक्षी ‘मोर’यांची संख्या ३२ असून रतनवाडीच्या पाणवठ्यावर १० निलगायी तसेच घाटनदेवी पाणवठ्यावर एक ‘रानगवा’आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. पाणी टंचाईचे सावट असताना देखील वन्यजीव विभागाने अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करुन पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी धडपड चालू ठेवली आहे.

Web Title: The need for eco-tourism tourism development in Akole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.