पर्यावरणावर आधारीत संवेदनशील कलाकृतींची गरज : पोपटराव पवार
By साहेबराव नरसाळे | Published: June 10, 2023 05:26 PM2023-06-10T17:26:42+5:302023-06-10T17:27:08+5:30
न्यू आर्टस् महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवात ते बोलत होते.
अहमदनगर : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत असून याबाबत आपण उदासीन होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाबाबत प्रबोधन करणाऱ्या संवेदनशील लघुपट, माहितीपटांची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी अहमदनगर येथे केले. न्यू आर्टस् महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवात ते बोलत होते.
अहमदनगर शहरातील रंगभूमी संस्थेच्या संकल्पनेतून अहमदनगर महानगरपालिका आणि न्यू आर्ट्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला होता. यात पुणे येथील 'डे झिरो' या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. यंदाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षीच्या तुलनेत पर्यावरणावर भाष्य करणाऱ्या लघुपट व माहितीपटांची संख्या कमी होत असल्याची खंत आयोजक कृष्णा बेलगावकर यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, दिग्दर्शक मंगेश बदर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, माणसाने निसर्गाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या जास्त प्रमाणात जाणवत आहेत. पुढील काळात चित्रपट, लघुपट यांसारख्या प्रभावी माध्यमांच्या मदतीने या समस्यांवर भाष्य झाले पाहिजे. कृषिमित्र पुरस्कारप्राप्त डॉ. वने, सचिन ठुबे, राहुल रसाळ आणि सुर्यकांत नेटके यांच्यासारखे शेतकरी असतील तर पुढील काही वर्षांत शेती व्यवसाय आणि शेतकरी हेच महत्वाचे घटक असतील, असे सांगत पवार यांनी त्यांचेही कौतुक केले.
वीणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले. रंगभूमीचे कृष्णा बेलगावकर यांनी आभार मानले. रंगभूमीचे समन्वयक आकाश गोटीपामुल, प्रा. अक्षय अंबाडे, मनीषा सानप, अभिजित भालेराव, शिवाजी तुले, दिपेश शिंदे, किशोर शिंदे यांनी हा महोत्सवासाठी परिश्रम घेतले.
विजेत्यांचा सन्मान
पर्यावरण महोत्सवात प्रथम क्रमांक पुणे येथील शुभम पांडव दिग्दर्शित 'डे झिरो' या लघुपटाला तर द्वितीय क्रमांक सुहास तरंगे दिग्दर्शित 'कोलाहल' आणि तृतीय क्रमांक प्रवीण खाडे दिग्दर्शित 'ताजमहल' या लघुपटास प्रदान करण्यात आला. बारामती येथील प्रा. राहुल चौधरी यांनी या लघुपटांचे परीक्षण केले. विजेत्या लघुपटांना रोख बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.वने, ठुबे, रसाळ, नेटके यांना कृषिमित्र पुरस्कार प्रदान
राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने निसर्गमित्र विशेष पुरस्कार हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना जाहीर करण्यात आला. तसेच डॉ. दत्तात्रय वने, सचिन ठुबे, राहुल रसाळ, सूर्यकांत नेटके यांना पवार यांच्या हस्ते 'कृषिमित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला.