व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड वाढविण्याची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:30+5:302021-05-05T04:34:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेवगाव : तालुक्यात वाढत्या रुग्णसंख्येसोबत उपचाराच्या सोयी-सुविधांचीही कमतरता भासत आहे. प्रकृती खालावलेल्या रुग्णासाठी ऑक्सिजन बेड, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव : तालुक्यात वाढत्या रुग्णसंख्येसोबत उपचाराच्या सोयी-सुविधांचीही कमतरता भासत आहे. प्रकृती खालावलेल्या रुग्णासाठी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडचा शोध घेता-घेता नातेवाइकांची दमछाक होते आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमधील ४ व्हेंटिलेटर बेड आणि १२४ ऑक्सिजन बेड अपुरे पडू लागले आहेत. वाढती रुग्णसंख्या व चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने आणखी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचाही साठा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम वारंवार ठप्प होत आहे. त्यामुळे एकूणच परिस्थिती चिंताजनक झाली आहे. सध्या शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह ७५ बेड, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल ३०० बेड, स्वर्गीय मारुतराव घुले पाटील कोविड सेंटर १०० बेड, लोकनेते गोपीनाथजी मुंढे कोविड सेंटर १०० बेड, बोधेगाव येथे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना २०० बेड, जनशक्ती कोविड सेंटर (अमरापूर) १०० बेड व चापडगाव येथे ५० बेड, स्वर्गीय पंडितअण्णा मुंढे कोविड सेंटर चापडगाव २० बेड अशी तालुक्यात एकूण ९४५ बेडची सुविधा विविध ८ कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध आहे. सध्या या सेंटरमध्ये २९६ रुग्ण भरती झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर ६४९ खाटा शिल्लक आहेत.
तालुक्यात शेवगाव ग्रामीण रुग्णालयासह ९ डीसीएचसी केंद्रे आहेत. या केंद्रात मिळून आयसीयू बेड २७, व्हेंटिलेटर बेड ४, ऑक्सिजन बेड १२४, तर अलगीकरण ७५ बेडची सुविधा उपलब्ध आहे. मात्र तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी डीसीएचसी केंद्रातील सध्याची व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची संख्या अपुरी पडत आहे. कोरोनाबाधित झालेल्यापैकी काही रुग्णांना श्वसनाचा त्रास होऊ लागताच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची आवश्यकता लागते आहे. अशा परिस्थितीमध्ये वेळेवर उपचार न झाल्यास रुग्णाला जीव गमवावा लागू शकतो. अशा वेळी तत्काळ उपचार मिळावे यासाठी अहमदनगर, बीड, औरंगाबाद आदी शहरांत व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ३२० वर पोहोचली आहे, तर १ हजार १४० बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.