आदिवासी क्रांतिकारकांच्या इतिहासावर संशोधनाची गरज : भाऊसाहेब चासकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:56 PM2019-08-12T12:56:44+5:302019-08-12T12:56:53+5:30
आदिवासी क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष झाले असल्याची खंत व्यक्त केली
राजूर : आदिवासी क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष झाले असल्याची खंत व्यक्त केली. या क्रांतिकारकांचा इतिहासाचे आज संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त राजूर प्रकल्प कार्यालयाच्या मवेशी येथील संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून चासकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुजाता वायळ, सदानंद राणे, वनक्षेत्रपाल डी.डी.पडवळे, डॉ.एम.के.भांडकोळी, बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्या रिया वाकचौरे, लोकपंचायतचे हनुमंत उबाळे, सरपंच कमल बांबळे, सहायक प्रकल्प अधिकारी साबळे, राजू पवार, राजेंद्र मैड उपस्थित होते.
आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करत मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. चासकर म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती आणि इतिहास समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगत पाठ्यपुस्तकांमधला आशय आणि भाषा यांचा आदिवासी मुलांच्या जीवनाशी मेळ खात नसल्याने विषयांमधल्या संकल्पना समजायला त्यांना जड जात असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वायळ, डॉ भांडकोळी यांनी आपले अनुभव यावेळी विषद केले. सहायक अभियंत्या वाकचौरे, प्रकल्प अधिकारी ठुबे यांनी मार्गदर्शन केले. शुक्रवारी सकाळी मवेशी संकुलात प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आदिवासी समाजाच्या चालीरिती व परंपरा यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या तीन क्रमांकांच्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर संकुलातील चारही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अदाकारीने उपस्थितांना खिळवून ठेवले. या विद्यार्थ्यांना वनक्षेत्रपाल पडवळे, डॉ भांडकोळी यांनीही रोख पारितोषिक देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. आभार प्राचार्य डॉ. देविदास राजगिरे यांनी मानले.