निळवंडे धरण ६५ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:40 PM2018-07-26T14:40:04+5:302018-07-26T14:40:36+5:30
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला. धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला. दरम्यान निळवंडे धरण ५० टक्के भरले आहे.
राजूर : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला. धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला. दरम्यान निळवंडे धरण ५० टक्के भरले आहे.
सुमारे तीन आठवडे भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला. तीन चार वेळा या परिसराला अतिवृष्टीचा तडाखाही बसला होता. मात्र मंगळवारपासून पाऊस कमी होत गेला. भंडारदरा परिसरात बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाची सर येत होती. येथे बुधवारी दिवसभराच्या बारा तासात केवळ नऊ मिमी पावसाची नोंद झाली.
शुक्रवारपासून भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे निळवंडे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली. या पाण्याबरोबर कळसूबाईच्या पर्वत रांगातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे निळवंडेचा पाणी साठा वाढत गेला. ८ हजार ३२० दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या निळवंडे धरणातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळी सहा वाजता ५ हजार ५४९ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला होता.
बुधवारी दिवसभराच्या बारा तासात भंडारदरा धरणात ११८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. यातील ६२ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होत सायंकाळी सहा वाजता पाणी साठा ९ हजार ३३१ दशलक्ष घनफूट झाला होता. बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात नोंदला गेलेला पाऊस मिमीमध्ये पुढील प्रमाणे- घाटघर ११९, रतनवाडी ९७, पांजरे ७२ भंडारदरा ६९ तर वाकी ४८ मिमी.