अण्णांच्या उपोषणाकडे माध्यमांचे दुर्लक्ष, आंदोलनाच्या इतिहासात प्रथमच असा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:46 AM2018-03-30T05:46:16+5:302018-03-30T05:46:24+5:30
माध्यमांनी जाणीवपूर्वक आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी केला आहे.
सुधीर लंके
अहमदनगर : अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी आपले आंदोलन स्थगित केले. या सात दिवसांत राष्टÑीय माध्यमांनी जाणीवपूर्वक आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी केला आहे. माध्यमांच्या भूमिकेबाबत राळेगणच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत जाहीर नाराजी नोंदवली आहे.
जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, शेतकऱ्यांना पेन्शन व निवडणुकांतील सुधार या मागण्यांसाठी अण्णांनी दिल्लीत रामलीला मैदानावर उपोषण सुरु केले होते. सातव्या दिवशी केंद्रातील दोन मंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अण्णांचे आंदोलन स्थगित झाले.
मात्र, अण्णांच्या या आंदोलनाची माध्यमांनी विशेष दखल घेतली नाही. अण्णांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना इतिहासात पहिल्यांदाच असा अनुभव आला. अण्णांचे आंदोलन म्हटले की आजवर माध्यमांचा गराडा असायचा. राळेगणसिद्धीत आंदोलन असले तरी राष्टÑीय वाहिन्यांचे प्रतिनिधी तेथे तळ ठोकून असायचे. काँग्रेस सरकारच्या काळात दिल्लीत झालेली आंदोलने राष्टÑीय वाहिन्यांनी दिवसभर ‘लाईव्ह’ दाखवली आहेत. यावेळीच असे काय घडले की माध्यमांना हे आंदोलन कव्हर करण्यासाठी दिवसभरात मिनिटभरही वेळ मिळाला नाही? असा प्रश्न अण्णांचे कार्यकर्ते अॅड. शाम असावा यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलन चालू असताना त्याचे वार्तांकन न करणाºया वाहिन्यांनी आंदोलन संपल्यानंतर मात्र लाईव्ह प्रक्षेपण केले, या विरोधाभासाकडेही असावा यांनी लक्ष वेधले आहे. ‘राष्टÑीय हिंदी माध्यमे गेली कोठे?’ असा प्रश्न असावा यांनी सोशल मीडियातून उपस्थित केला. माध्यमांनी आंदोलनाचे वार्तांकन न केल्यामुळे अण्णांच्या ‘टीम’ने ‘सोशल मीडिया’ची पर्यायी टीम उभी केली होती. २८ कार्यकर्ते फेसबुक लाईव्हसाठी कार्यरत होते. तसेच यु ट्यूबचा वापर करुन आंदोलन प्रसारित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अण्णांचे आंदोलन सरकारसोबत माध्यमेही दडपत आहेत, असा आरोप राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनीही केला आहे. मंगळवारी राळेगणसिद्धीत झालेल्या सभेत माध्यमांच्या प्रतिनिधींना गावात येऊच द्यायचे नाही, असा ठराव मांडण्यात आला होता. माध्यमांविषयी जाहीर नाराजी मात्र ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अण्णांचे आंदोलन हे लोकहितास्तव होते. त्यात बातमीमूल्य होते. मात्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आंदोलन दडपण्यासाठी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. केवळ काही मराठी वृत्तपत्रांनी आंदोलनाचे वार्तांकन केले. माध्यमांच्या या भूमिकेचा आपण ग्रामसभेत निषेध केला आहे.
- लाभेष औटी, उपसरपंच, राळेगणसिद्धी
‘लोकमत’ व एक-दोन मराठी वृत्तपत्रांनीच अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली. इतर माध्यमांनी दुर्लक्ष केले. माध्यमे कुणाच्या प्रभावाखाली वावरत असतील तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.
- अॅड. शाम असावा, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनातील कार्यकर्ते.