माजी मंत्र्याच्या कारखान्यातील स्पिरीट तस्करीकडे दुर्लक्ष; राजकीय दडपण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 06:14 AM2020-09-23T06:14:02+5:302020-09-23T06:14:13+5:30
उत्पादन शुल्क विभागाची बेपर्वाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : भाजप आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अधिपत्याखालील साईकृपा शुगर लिमिटेड या साखर कारखान्यातील स्पिरीट (मद्यार्क) अवैधरीत्या बाजारात जात असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतरही उत्पादन शुल्क विभाग या गुन्ह्याचा तपास करताना टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे हे स्पिरीट धुळे जिल्ह्यात हातभट्टीसाठी जात होते. मात्र, ज्यांना स्पिरीट पाठविले जात होते, ते आरोपीही या विभागाला अद्याप सापडू शकलेले नाहीत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे गत १५ मार्च रोजी पकडलेल्या एका मालमोटारीत २२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १८ हजार लीटर स्पिरीट सापडले. हे स्पिरीट अवैधरीत्या कारखान्यातून बाहेर काढण्यात आले. स्पिरीट कोणत्या कारखान्यातून आले तेच अगोदर जाहीर केले जात नव्हते. मात्र, ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर हे स्पिरीट साईकृपा कारखान्यातून धुळे जिल्ह्यात हातभट्टीसाठी नेले जात होते, अशीमाहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.
या प्रकरणी आतापर्यंत केवळ मालमोटारीचे चालक व कारखान्यातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील संबंधित हातभट्टीवाले फरार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तपासावर राजकीय दडपण नाही. कारखाना राजकीय नेत्याचा असला तरी कारवाई टाळली जाणार नाही. या प्रकरणात काही अनियमितता आहे का? आतापर्यंत काय तपास झाला आहे, याचा अहवाल मागितला जाईल़ प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. - प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग