नगर पोलीस मॅरेथॉनमध्ये नेहा खाडे, अक्षय शिंदे, निकेतन पालवे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:05 PM2018-01-08T14:05:40+5:302018-01-08T14:08:03+5:30
पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत दोन हजार नगरकर सहभागी झाले होते. स्पर्धेत नेहा खाडे (तीन किलोमीटर), अक्षय शिंदे (पाच किलोमीटर) व निकेतन पालवे (दहा किलोमीटर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
अहमदनगर : पोलीस दल स्थापना दिनानिमित्त रविवारी येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत दोन हजार नगरकर सहभागी झाले होते. स्पर्धेत नेहा खाडे (तीन किलोमीटर), अक्षय शिंदे (पाच किलोमीटर) व निकेतन पालवे (दहा किलोमीटर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
महिलांसाठी तीन किलोमीटरची पोलीस मुख्यालय ते मनमाड रोड तर पुरूषांसाठी पाच आणि दहा किलोमीटरची मुख्यालय ते कल्याण रोड असे स्पर्धेचे अंतर होते. जिल्हाधिकारी अभय महाजन व जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याहस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपाधीक्षक मनीष कलवानिया, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नगरसेवक सुवेंद्र गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अॅड़ सुरेश लगड आदी उपस्थित होते़ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, अधिकारी, महिला, ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेत सहभागी झाले होते़ सहभागी स्पर्धकांना क्रॉम्प्टन ग्रिव्हीज कंपनीच्या वतीने टी शर्ट देण्यात आले.
पोलीस दल स्थापना दिनानिमित्त २ ते ६ जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, महिला पत्रकारांना ठाणे अंमलदाराच्या कामाचा अनुभव घेता आला.
शेवटच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ विजेत्यांना उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले़ उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आभार मानले.
मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले ७९ वयाचे डॉ़ पांडुरंग झगडे यांनी दहा किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. तर सहा वर्षे वयाची काव्या फिरोदिया ही या स्पर्धेत धावली. या दोघांचा पोलीस अधीक्षकांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.