ना संस्था, ना साखर कारखाना, आमदार निलेश लंकेंनी कोविड सेंटरसाठी 'असा' पैसा उभारला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:12 AM2021-05-10T10:12:45+5:302021-05-10T10:13:42+5:30
गावातील यात्रेला जसं वर्गणी आणि धान्य गोळा केलं जातं, तसंच इथं होत आहे. राज्यातून, देशातून आणि परदेशातूनही आम्हाला मदत मिळत आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी मोफत कोरोना केंद्र सुरू केलं असून त्यांच्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. पारनेरमधील नागरिक निलेश लंके यांना थेट देवमाणूस समजू लागले आहेत. आमदार निलेश लंके स्वत: या कोविड सेंटरमध्ये दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, कुठलिही शिक्षण संस्था नाही, की कुठलाही साखर कारखाना नाही, मग आमदार लंके यांनी 1100 बेडचं कोविड सेंटर उभारलं कसं, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सर्वसमावेशक उत्तर दिलंय.
आमदार निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारलं आहे. मी आमदारकीची निवडणूक देखील लोकवर्गणीतून लढवली होती. माझ्याकडं संस्था नाही, किंवा साखर कारखाना नाही, म्हणजे मी काहीच करायचं नाही का? असा प्रतिप्रश्नच लंके यांनी केला. मी जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा, मदतीचे अनेक हात पुढे आले. दररोज मोठ्या प्रमाणात मदत येत आहे, कुणी रेशन देतंय, कुणी भाजीपाल देतंय तर कुणी रोख स्वरुपात देणगी देत असल्याचं आमदार लंके यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.
गावातील यात्रेला जसं वर्गणी आणि धान्य गोळा केलं जातं, तसंच इथं होत आहे. राज्यातून, देशातून आणि परदेशातूनही आम्हाला मदत मिळत आहे. धान्याचा विचार केला तर 9-10 ट्रक धान्य आलंय. भाजीपाल्यासाठी रांग लागतेय. विशेष म्हणजे पुढील 1-2 महिन्यांसाठी जेवणाच्या पंक्ती बुक झाल्यात. जेवण कुणी द्यायचं, नाष्टा कुणी द्यायचा, ड्राय फ्रूटस् कुणी द्यायचे, फळ कुणी द्यायचं हे आधीच ठरलंय. एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जसं लोकं मदत करतात. अगदी तशीच मदत मिळत आहे. विशेष म्हणजे आमच्या जिल्ह्यात शिर्डी साईबाबांचं देवस्थान आहे. तेथे ज्याप्रमाणे दान दिलं जातं, तसंच दान येथेही मिळतय. म्हणूनच, मी कधी-कधी विनोदाने म्हणतो की, हे प्रतीशिर्डीच आहे, अशा शब्दात कोविड सेंटरला होणारी मदत आणि आर्थिक भार याबद्दल आमदार लंके यांनी लोकमतशी बोलताना वस्तूस्थिती समोर मांडली.
शरद पवारांनी फोन करुन केली चौकशी
निलेश लंके कोरोना कालावधीतील कामगिरीची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: घेतली. शरद पवार यांनी रुग्णालयातून घरी आल्यावर आमदार निलेश लंके यांना फोन केला होता. "निलेश तू कोरोना रुग्णांसाठी मोफत कोविड सेंटर सुरू केले ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. तू स्वत: त्यात जातीनं लक्ष देतोयस. त्या ठिकाणी रुग्णांची अतिशय चांगली व्यवस्था देखील ठेवली आहेस असं समजलं हे अतिशय चांगलं काम आहे. पण, हे काम करताना तू स्वत:चीही काळजी घे आणि काहीही अडचण आली तर मला कळव", असं शरद पवार यांनी निलेश लंके यांना म्हणाले आणि मोठा आधार दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारलं आहे. शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर असं त्यांनी या सेंटरला नाव दिलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही निलेश लंके यांनी लोकांसाठी कोविड सेंटर उभारलं होतं.