ना वाजंत्री ना वराती, वटवृक्षांच्या साक्षीने घेतले सप्तपदीचे फेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:29+5:302021-01-13T04:53:29+5:30
तिसगाव : पर्यावरणाचे संवर्धन व मूलगामी महत्व समजण्याच्या उद्देशाने पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील प्रा. प्रमोद पवार व शुभांगी ...
तिसगाव : पर्यावरणाचे संवर्धन व मूलगामी महत्व समजण्याच्या उद्देशाने पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील प्रा. प्रमोद पवार व शुभांगी राठोड ही दोघं वटवृक्षाच्या साक्षीने सुर्यास्ताच्या संधीपर्वात सप्तपदीचे फेरे घेत विवाहबद्ध झाली. ना वाजंत्री,ना वराती, ना पुरोहित असा काहीच डामडौल न ठेवता आकाशाचा मंडप, वृक्ष-लतावेली व पशुपक्ष्यांच्या सोबतीने सद्गुरूवाडी (ता. पाथर्डी) येथील आनंदवनात तीन दिवसांपूर्वी झालेला हा अनोखा विवाह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
आनंदवनच्या प्रवेशद्वारापासून झेंडूंच्या फुलांच्या वधू-वरांसाठी टाकलेल्या पायघड्या, तर वृक्षानाही फुलांच्या हारांची केलेली सजावट सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. प्रारंभी वटवृक्षाजवळ वधू-वरांनी दीप प्रज्वलन केले. एकमेकांच्या गळ्यांत वृक्षलतावेलींचा हार घातला. वटवृक्षाच्या पानांना स्पर्श करत या नवदाम्पत्याने वृक्षलागवडीचा संकल्प केला. यावेळी शिवाजी जाधव, प्रियंका जाधव, अमोल राठोड, दिनेश राठोड, प्रभाकर पवार, दिनेश पवार, गणेश पवार आदी या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक संदीप राठोड यांच्या संकल्पनेतून वन विभागाच्या जमिनीवर साकारलेले आनंदवन या अनोख्या विवाह समारंभाने चर्चेत आले आहे.
पृथ्वीतलावरची सगळी निर्मिती निसर्गाची आहे. अन्न, वस्त्र, निवारा ही त्याची देण आहे. पहिल्यांदा निसर्गाची पुजा हवी. हा संदेश कृतीत आणण्यासाठी एक व्यक्ती एक झाड संकल्पना जपली जावी. प्रत्येक जीवजंतूच्या रक्षणार्थ ती कृती मोलाची ठरणार आहे. पर्यावरण संरक्षणाचा संदेश सर्वत्र पोहोचावा, या उद्देशातून आम्ही अशा पद्धतीने विवाह करून नवीन जीवनाची सुरुवात केली आहे.
- प्रा. प्रमोद पवार व शुभांगी राठोड, नवदाम्पत्य.
फोटो १० विवाह
ओळी- पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील प्रा. प्रमोद पवार व शुभांगी राठोड यांनी वटवृक्षाला सप्तपदीचे फेरे घातले आणि विवाहबद्ध झाले.