नेवासा रेशन वितरण व्यवस्थेची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:07+5:302021-01-13T04:50:07+5:30
नेवासा : नेवासा तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्थेची सखोल चौकशी करावी, या नेवासा काँग्रेस कमिटीच्या मागणीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ...
नेवासा : नेवासा तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्थेची सखोल चौकशी करावी, या नेवासा काँग्रेस कमिटीच्या मागणीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. नेवासा तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीबाबत अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असून, संबंधीत शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी संगनमत करून रेशन चालकांनी कोट्यवधी रुपयांचा गफला केल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने कोणत्याही गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये, या उदात्त हेतूने शासनाने रेशन वितरण प्रणालीच्या माध्यमातून मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला होता. मात्र, त्यावरही या लोकांनी डल्ला मारल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यातील बहुतांश लोकांना हे अन्नधान्य पुरेशा प्रमाणात पोहोचलेच नाही. दिवाळीनिमित्त शासनाने पाठवलेली साखरही या लोकांनी गायब केल्याच्या गंभीर तक्रारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.