नेवासा : सुखदान यांना स्थानिक असूनही फायदा नाही, सेनेलाच आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 06:11 PM2019-05-24T18:11:52+5:302019-05-24T18:15:40+5:30
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखधान यांनी अनपेक्षितपणे मोठ्या संख्येने मतदान मिळविले. मात्र स्थानिक असूनही नेवासा शहरासह तालुक्यात त्यांना अपेक्षित मतदान पडले नाही.
सुहास पठाडे
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखधान यांनी अनपेक्षितपणे मोठ्या संख्येने मतदान मिळविले. मात्र स्थानिक असूनही नेवासा शहरासह तालुक्यात त्यांना अपेक्षित मतदान पडले नाही. त्या तुलनेत श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी येथे त्यांना चांगल्या प्रकारे मतदान झाले. येथे खासदार सदाशिव लोखंडे यांनाच आघाडी मिळाली.
संजय सुखधान यांना वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी उमेदवारी दिली होती. त्यामुळे नेवासा शहरासह तालुक्यातून त्यांना चांगले मताधिक्य राहिल, असा अंदाज होता. येथील स्थानिक उमेदवार असूनही नेवाशाच्या जनतेने त्यांना अपेक्षित मतदान केले नाही. सुखधान यांना नेवासा विधानसभा क्षेत्रात १० हजार ६१३ मतदान झाले. याशिवाय श्रीरामपूर येथे १४ हजार ६६५, कोपरगावला १४ हजार १४०, शिर्डी येथे १३ हजार ६७७ अशी मते सुखधान यांना मिळाली आहेत. कॉँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांची सगळी भिस्त माजी आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्यावर होती. ते तिघेही पाहिजे तशी वातावरण निर्मिती करू शकले नाहीत. विखेंच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते विखेंसोबत गेले. खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात नाराजी असल्याचे बोलले जात होते. मात्र तसे काही दिसून आले नाही. लोखंडे यांना या विधानसभा क्षेत्रातून १९ हजार ७३४ मतांचे मताधिक्य मिळाले. लोखंडे यांच्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही प्रचार केला. या निवडणुकीत गडाखांच्या हाती काहीच लागले नाही.
आमदार मुरकुटे यांना दिलासा
शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे विजयी झाल्याने आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना सर्वाधिक दिलासा मिळाला आहे. तसेच देशभर पुन्हा मोदी लाट दिसून आली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही या लाटेचा फायदा होऊन पुन्हा निवडून येऊ अशी अपेक्षा मुरकुटे यांना आहे. याशिवाय संजय सुखधान यांनीही शिर्डी मतदारसंघात मिळविलेल्या मतदानामुळे चांगलेच वातावरण तयार केले आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांना मात्र या निवडणुकीतून कोणताच दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना विधानसभेसाठी पुन्हा नवी रणनिती आखावी लागेल.
की फॅक्टर काय ठरला?
काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंची भिस्त राष्टÑवादी काँग्रेसचे नेते गडाख, घुलेंवरच राहिली. ते परावलंबी होते.
खासदार सदाशिव लोखंडे यांना भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे सहकार्य मिळाल्याने नेवासाशा आघाडी मिळाली.
खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात नाराजी असल्याचे बोलले जात होते. मात्र तसे काही दिसून आले नाही. सामान्य मतदारांनी मोदी लाटेला प्रतिसाद दिला.
विद्यमान आमदार
बाळासाहेब मुरकुटे। भाजप