बेलापुरातील बँकेचे नवीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:48+5:302021-02-18T04:35:48+5:30
बेलापूर : बेलापूर शहराचा वाढता लोकसंख्येचा विस्तार पाहता बँक ऑफ महाराष्ट्रने मोकळ्या व प्रशस्त जागेत स्थलांतर करावे अशी मागणी ...
बेलापूर : बेलापूर शहराचा वाढता लोकसंख्येचा विस्तार पाहता बँक ऑफ महाराष्ट्रने मोकळ्या व प्रशस्त जागेत स्थलांतर करावे अशी मागणी विद्यार्थी काँग्रेसचे नेते गोपाल जोशी यांनी केली आहे. बँकेची शाखा दुसर्या मजल्यावर असल्याने वृद्ध व अपंगांची गैरसोय होत असल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे.
शहरातील शनि मंदिराजवळ बँकेची शाखा आहे. राष्ट्रीयीकृत बँकेची ती एकमेव शाखा असल्याने ग्राहकांची येथे मोठी संख्या आहे. मात्र दुसऱ्या मजल्यावरील बँकेत दैनंदिन व्यवहाराकरिता जाताना वृद्ध व अपंगांची गैरसोय होत आहे. झेंडा चौकापासून ते शनि मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. त्यात बँकेकडे स्वत:चे वाहनतळ नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. शहरवासीयांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो, असे जोशी यांचे म्हणणे आहे. बँकेने शहरात मोकळ्या जागेत स्थलांतर करत शाखा सुरू करावी, त्याची दखल घेतली नाही तर विद्यार्थी काँग्रेस शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जोशी यांच्यासह वैभव कुर्हे यांनी दिला आहे.
दरम्यान, नवीन जागेत स्थलांतरासाठी उपाययोजना हाती घेतल्या असून संबधित तक्रारदारांनी अर्ज केल्यास वरिष्ठांना कळविण्यात येईल, अशी माहिती नगर येथील अधिकारी सत्यवान कोकणे यांनी दिली.