पारनेरमध्ये तरुणांची नवी फळी, प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:20 AM2021-02-12T04:20:00+5:302021-02-12T04:20:00+5:30

पारनेर : अनेक प्रस्थापितांना धक्का देत पारनेर तालुक्यातील ८८ पैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये तरुणांच्या नव्या फळीकडे सरपंच, उपसरपंच, सदस्य म्हणून ...

A new board of youth in Parner, a shock to the established | पारनेरमध्ये तरुणांची नवी फळी, प्रस्थापितांना धक्का

पारनेरमध्ये तरुणांची नवी फळी, प्रस्थापितांना धक्का

पारनेर

: अनेक प्रस्थापितांना धक्का देत पारनेर तालुक्यातील ८८ पैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये तरुणांच्या नव्या फळीकडे सरपंच, उपसरपंच, सदस्य म्हणून सत्तेची दोरी हाती आली आहे. यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समितीच्या निवडणुकीत तरुणांची दखल पक्षीय नेतृत्वास घ्यावी लागेल.

आमदार नीलेश लंके यांच्यामुळे तरुण राजकारणात आले, ही घडामोड ग्रामपंचायतींमध्ये प्रकर्षाने दिसून आली. निघोज, सुपा, वडझिरे, टाकळी ढोकेश्वर या ग्रामपंचायतींमध्ये नवख्या तरुणांनी राजकीय खेळी करीत प्रस्थापितांना धक्के दिले. सुपा येथे अपक्ष सागर मैड याने मातब्बर नेते राजू शेख यांचा पराभव केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी सभापती दीपक पवार, दत्तात्रय पवार यांनी सागर यास उपसरपंच देत सरपंचपद मनीषा रोकडे यांना देऊन शेख गटाला दुसरा धक्का दिला. टाकळी ढोकेश्वरमध्ये ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी व माजी सरपंच शिवाजी खिलारी यांच्या राजकीय वर्चस्वाला काहींनी बरोबर राहून आणि काहींनी विरोधात राहून धक्का दिला. येथे सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण यांच्या ताब्यात सत्ता घेतली. निघोजमध्ये सरपंच ठकाराम लंके यांना व पत्नीलाही पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सचिन वराळ यांनी सरपंचपदी पत्नी चित्रा वराळ व उपसरपंचपदी ज्ञानेश्वर वरखडे यांची नियुक्ती करून ठकाराम लंके यांच्या हातातून सत्ता काढून घेतली. आमदार नीलेश लंके यांनी सचिन वराळ यांना दिलेले बळ आणि निवडीनंतर केलेला सत्कार ठकाराम लंके यांना राजकीय निवृत्ती देणारा ठरला आहे.

वडझिरेमध्ये युवा अनिल गंधाक्ते याने कामगार नेते अनेक वर्षे सरपंचपद भूषविलेले शिवाजी औटी यांचा पराभव केला. अपक्ष सोमनाथ दिघे या तरुणाने उपसरपंचपद मिळवून गावातील सत्ता तरुणांच्या हातात असल्याचा संदेश दिला. काशिनाथ दाते- पोखरी, रामदास भोसले- दरोडी, राहुल शिंदे-रांजणगाव मशीद, देवीदास आबूज- सारोळा आडवाई, सचिन वराळ- निघोज, मधुकर उचाळे- शिरापूर, विक्रमसिंह कळमकर- पाडळी रांजणगाव, संतोष काटे- रांधे यांनी सत्ता राखली. जिल्हा बँकेचे संचालक उदय शेळके यांना मात्र गावात सत्ता राखता आली नाही.

----

मनसेची संधी हुकली

मनसेचे वसीम राजे, सतीश म्हस्के, नारायण नरवडे हे बोटावर मोजण्याइतके किरकोळ कार्यकर्ते असताना कडूस गावात नारायण नरवडे या युवकाला सरपंचपद मिळण्याची शक्यता होती. मात्र, गावातील प्रस्थापितांनी एकत्र येऊन नरवडे यास दूर ठेवले आणि मनसेची तालुक्यातील पहिल्या सरपंचपदाची संधी हुकली.

----

युवा सरपंच, उपसरपंच असे

पानोली- शिवाजी शिंदे, म्हसोबा झाप- प्रकाश गाजरे, सुपा- सागर मैड, वडझिरे- सोमनाथ दिघे, अळकुटी- शरद घोलप, राळेगणसिद्धी- डॉ. धनंजय पोटे, अनिल मापारी, काटाळवेढा- पीयूष गाजरे, देवीभोयरे- विठ्ठल सरडे, संपत वाळुंज, चिंचोली- योगेश झंझाड, पिंपरी जलसेन आदींसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये युवा सरपंच, उपसरपंच यांच्या ताब्यात सत्ता आहे.

Web Title: A new board of youth in Parner, a shock to the established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.