नगर, औरंगाबाद, नांदेडमध्ये ऊस गाळपाचा नवा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:30 PM2018-04-02T17:30:25+5:302018-04-02T17:30:55+5:30
१ नोव्हेंबरपासून सुरू झालेला महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. १ एप्रिलपर्यंत राज्यातील ७८ कारखाने बंद झाले असून राज्याच्या साखर कारखानदारीची ऊस गाळप व साखर उत्पादनात नव्या उच्चांकाकडे वाटचाल सुरू आहे.
मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. १ एप्रिलपर्यंत राज्यातील ७८ कारखाने बंद झाले असून राज्याच्या साखर कारखानदारीची ऊस गाळप व साखर उत्पादनात नव्या उच्चांकाकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती या विभागांनी ३० मार्चअखेर गाळपाचा नवा उच्चांक नोंदविला आहे.
राज्याचा यंदाचा साखर हंगाम
राज्यात सन २०१४-१५ च्या हंगामात सर्वाधिक ९३०.४१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते. त्यातून १०५१.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. ९९ सहकारी व ७९ खासगी कारखान्यांचा या हंगामात समावेश होता. साखर आयुक्तालयाच्या ३० मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार राज्यातील १०१ सहकारी व ८६ खासगी अशा १८७ साखर कारखान्यांमधून ९००.८१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून त्यातून १००४.५७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.१५ टक्के एवढा आहे.
अहमदनगरने मोडला दशकातील विक्रम
साखर आयुक्तालयांतर्गत अहमदनगर व नाशिक जिल्ह्याचा समावेश असलेल्या अहमदनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारित १७ सहकारी व १० खासगी अशा २७ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. या कारखान्यांनी ३० मार्चअखेर १३२.११ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप १४२.७७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. अहमदनगर विभागाने १४-१५ चा १३० लाख मेट्रिक टन गाळपाचा गेल्या दहा वर्षांमधील उच्चांक मोडून यंदाच्या हंगामात गाळपाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अहमदनगर विभागात १४-१५ मध्ये १३० लाख मेट्रिक टन गाळप होऊन १४.३८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते. १५-१६ मध्ये १०४.४३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ११.३८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते.
मराठवाड्यातही विक्रमी गाळप
अहमदनगरसोबतच मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड या दोन्ही विभागांसह विदर्भातील अमरावती विभागानेही गाळपाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.