नव्या औद्योगिक वसाहतीला शिर्डी-कोपरगावचे नाव द्यावे
By सचिन धर्मापुरीकर | Published: November 30, 2023 05:04 PM2023-11-30T17:04:42+5:302023-11-30T17:05:08+5:30
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश.
कोपरगाव (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र सरकारने राहाता व कोपरगाव तालुक्यातील शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) स्थापन करण्याचा निर्णय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. संजीवनी युवा प्रतिष्ठान यासाठी गेल्या पाच वर्षापासून पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने या औद्योगिक वसाहतीला शिर्डी-कोपरगाव औद्योगिक वसाहत असे नाव द्यावे, अशी विनंती संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली.
एमआयडीसी स्थापन करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे कोपरगावात संजीवनी प्रतिष्ठानने स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर फटाके वाजवून व पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. या निर्णयाबाबत पत्रकार परिषदेत बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, औद्योगिक वसाहतीसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानने २०१८ पासून प्रयत्न सुरू केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुक्यातील बेरोजगार तरूणांच्या सह्यांचे निवेदन सर्वप्रथम पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या जमिनी न घेता एमआयडीसी स्थापन करावी, त्यासाठी वारी, संवत्सर, सोनेवाडी येथील शेती महामंडळाची जागा सुचविण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, मंत्री चंद्रकांत पाटील व आताचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी पत्रव्यवहार होत होता. २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे पत्रही संजीवनी युवा प्रतिष्ठानला प्राप्त झाले. तत्पूर्वी शेती महामंडळाच्या जागेचे उतारे शासनास पाठविले होते. त्याची दखल उद्योग मंत्री सामंत यांनी घेतली. महसूल विभागाकडे जागेची मागणी केली. त्यानंतर बुधवारी (दि. २९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औद्योगिक वसाहत स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे विवेक कोल्हे म्हणाले.
कोपरगाव तालुक्यातील २३२ एकर जमीन :
शेती महामंडळाच्या ५०२ एकर जमिनीवर नवीन औद्योगिक वसाहत स्थापन होणार आहे. त्यातील २३२ एकर जमीन कोपरगाव तालुक्यातील आहे. याशिवाय संवत्सर येथील महामंडळाच्या जागेवर आयटी हब तयार होऊ शकते. त्याबाबतही शासनाकडे संजीवनी युवा प्रतिष्ठानचा पाठपुरावा सुरू असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले.