कोरोनाच्या गडद संकटात रुग्णसेवेचा नवा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:27+5:302021-07-01T04:15:27+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण रुग्णालयात विशेष कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. १ जून २०२० ते १३ फेब्रुवारी ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण रुग्णालयात विशेष कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. १ जून २०२० ते १३ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान हे केंद्र सुरू होते. त्यावेळी कोरोनाची लागण झालेल्या अडीच हजारहून अधिक रुग्णांनी येथे उपचार घेतले. गरजूंसाठी हे केंद्र संजीवनी ठरले. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ते बंद करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट आली. अनेकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने हे केंद्र पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करण्यात आले. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली, आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याने यंत्रणेवर ताण पडला. रुग्णांना बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळत नव्हते. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मृत्यूदर वाढला. मात्र, अशा कठीण परिस्थितीतदेखील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप कचेरिया, डॉ. सीमा घोगरे यांसह सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कचेरिया यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत आलेल्या अनुभवाचा फायदा झाला.
एकीकडे दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनअभावी मृत्यूला सामोरे जावे लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या; परंतु संगमनेरातील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे अनेक रुग्णांचा जीव वाचला. केवळ २५ टक्के रुग्णांना रेमडेसिविरचा वापर करण्यात आला. ऑक्सिजन वापरताना ज्यांना खरी गरज आहे, अशा रुग्णांना प्राधान्य देण्यात आले. पालथे, पोटावर झोपण्यास वैद्यकीय भाषेत प्रोनिंग असे म्हणतात. प्रोनिंगमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी सुधारण्यास मदत होते. श्वास घेण्यासाठी असलेल्या सोप्या पद्धतींपैकी प्रोनिंग ही चांगली पद्धत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना अनेकांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी कमी होऊन त्यांना श्वास घेण्यात अडचण होत होती. त्यावेळी उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रोनिंग पद्धतीचा फायदा झाला.
------------
ऑक्सिजनचे शंभर बेड
कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, ऑक्सिजनचे शंभर बेड येथे असतील. लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात असताना लहान मुलांसाठी विशेष कोविड कक्ष सुरू करण्यात आला आहे. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हे बालरोग तज्ज्ञ असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा लहान मुलांवर उपचार करताना होणार आहे.
----------------
ग्रामीण रुग्णालयाकडे ओढा
कोरोनाची लाट आल्यानंतर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात विशेष कोविड आरोग्य केंद्र युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. गंभीर कोरोना रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. ते बरे होऊन सुखरूप घरी परतले.
संगमनेर तालुक्यातील नागरिकांबरोबरच नाशिक, पुणे, धुळे, जळगाव जिल्ह्यातील रुग्णांवरही येथे उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्णांचा ओढा उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाकडे आहे. कोविड आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम गतीने सुरू आहे.
-----------------