जिल्ह्याच्या प्रशासनात नवे राज, संपदा मेहता जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 11:02 PM2016-04-28T23:02:03+5:302016-04-28T23:20:39+5:30
अहमदनगर : नगरच्या नव्या जिल्हाधिकारीपदी संपदा मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सध्या त्या कार्यरत आहेत़
अहमदनगर : नगरच्या नव्या जिल्हाधिकारीपदी संपदा मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सध्या त्या कार्यरत आहेत़ येत्या दोन दिवसांत मेहता जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहेत़
गेल्या दोन वर्षांपासून त्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मेहता नगरच्या चौथ्या महिला जिल्हाधिकारी असणार आहे. त्या मुळच्या पुणे येथील आहेत़ वडील सुरेश मेहता यांची पुणे शहरात मोठी सी़ ए़ संस्था आहे़ त्यांचे पती रणजित कुमार सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत़ युपीएससी परीक्षेत संपदा मेहता राज्यात ४८ व्या तर देशात २१ व्या आहेत़ त्यांनी यापूर्वी सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रकल्प अधिकारी आदी पदांवर काम केले आहे़
रवींद्र बिनवडे नवे सीईओ
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची बदली झाली आहे. बिनवडे लवकरच नगरला हजर होणार आहेत.
नांदेडहून येणारे बिनवडे हे २०१२ च्या बॅचचे ‘आयएएस’ उत्तीर्ण आहेत. त्यांना पहिली नेमणूक महसूल विभागात नांदेड जिल्ह्यात मिळाली होती. त्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाच्या कामकाजाची धुरा समर्थपणे पेलल्यानंतर बिनवडे यांना दुसरी पोस्टींग नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मिळाली आहे. बिनवडे हे लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. अवघ्या दोन वर्षात नगर जिल्हा परिषदेला नव्याने फ्रेश आयएएस अधिकारी मिळाल्याने प्रशासकीय कामकाज आणखीन गतीमान होणार आहे.
दिलीप गावडे नवे आयुक्त
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेचे आयुक्त विलास ढगे यांची बदली झाली आहे. ढगे यांच्या जागी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेले दिलीप गावडे यांची नगरचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ते मुळचे पुण्याचे आहेत. राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. विधानसभा सभापतीचे स्वीय सहाय्यक म्हणूनही ते कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना ‘आयएएस’ दर्जा मिळाला आहे. अहमदनगर महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. ती सुधारण्याचे आव्हान गावडे यांच्यासमोर असणार आहे.
अनिल कवडे ‘आयसीडीएस’ला आयुक्त
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या (आयसीडीएस) आयुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी १६ फेब्रुवारी २०१४ मध्ये नगरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता़ गेल्या सव्वा दोन वर्षांत अनेक महत्वाचे प्रकल्प त्यांनी पूर्ण केले़ कवडे यांना दोन वर्षांतच पदोन्नती मिळाली़ आॅनलाईन सातबाऱ्यात नगर राज्यात प्रथम ई- रॉकर्ड उपक्रमाला गती
जलयुक्त शिवार अभियान , प्रशिक्षण प्रबोधिनीची स्थापना, कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय , प्रादेशिक पाणी योजनांना मीटर, जिल्ह्यातील २०० ते ३०० टँकरची बचत, राज्यात प्रथमच मोबाईल अॅप, सुशासन पुस्तिका प्रकाशित आदी उपक्रम कवडे यांनी राबविले आणि त्याला चांगले यश मिळाले.
कवडे यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून जिल्हाभर शासनाच्या विविध योजना गावागावापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसादही मिळाला.
नवाल पालघरचे जिल्हाधिकारी
नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. फेबु्रवारी २०१४ ला नवाल यांनी नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. अल्पावधीत नवाल जिल्हा परिषदेत पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी आणि प्रसिध्दी माध्यमांचे चाहते झाले होते.
कामाच्या अनोख्या शैलीने त्यांनी नगर जिल्ह्यात वेगवेगळे प्रयोग राबवले होते. कुपोषण, मुलींच्या घटता जन्मदर वाढवणे, माणसांपासून ते जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग, एबीएल उपक्रम, दीपस्तंभ, आरोग्य दीप, माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर त्यांनी केला होता. आॅनलाईन तक्रार निवारण प्रणाली, आॅनलाईन भविष्य निर्वाह निधी सुविधा, मध्यवर्ती टपाल कक्ष, फाईल ट्रॅकिंग सिस्टीम, एस.एम.एस. सुविधा, टोल फ्री दूरध्वनी सेवा, संपदा मोबाईल अॅप्लीकेशन आदी उपक्रम नवाल यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते.
अखेर ढगे यांचा मनपाला ‘राम राम’
जुलै २०१५ मध्ये विलास ढगे हे आयुक्त म्हणून अहमदनगर महापालिकेत रुजू झाले होते. रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत त्यांचे कनिष्ठ अधिकाऱ्यांशी सूत जुळाले नाही. चाळीस कोटी रुपयांचा निधीतून प्रस्तावित कामांच्या यादीत घोळ झाल्याचा आरोप करत त्यांना विरोधकांच्या टिकेला सामोरे जावे लागले.
महासभेत सभात्याग करण्याचा नगर महापालिकेतील इतिहास ढगे यांनी घडविला. ठोस, विकासात्मक असे उल्लेखनीय काम ढगे यांच्या कारकिर्दीत झालेच नाही. इच्छा असूनही काम करता येत नसल्याची खंत ते वारंवार बोलून दाखवत होते. पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी त्यांचे जमले नाही. प्रशासनावरही त्यांची पकड नव्हती. गत महिन्यात त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीचा अर्जही शासनाकडे केला होता. त्यावर निर्णय होण्यापूर्वीच त्यांच्या बदलीचे आदेश निघाले.
सेनेच्या नगरसेविका शारदा ढवण यांच्या आंदोलनामुळे आयुक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.