बातमी आणि फॅक्ट - पोलिसांनी साहित्य खरेदी केलेले दुकान सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:44 AM2019-06-03T10:44:49+5:302019-06-03T10:45:43+5:30
पारनेर पोलिसांनी पोलीस स्टेशनचे सुशोभिकरण करताना कोणाकडून देणग्या घेतल्या त्याची यादी सादर केली आहे.
सुधीर लंके
अहमदनगर : पारनेर पोलिसांनी पोलीस स्टेशनचे सुशोभिकरण करताना कोणाकडून देणग्या घेतल्या त्याची यादी सादर केली आहे. मात्र ज्या दुकानांतून साहित्य घेतले ती बिले संशयास्पद दिसतात. पारनेरमधील साईकृपा प्लायवूड हे दुकानच आढळून येत नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
समाजातून देणग्या घेऊन पोलीस स्टेशनचे सुशोभिकरण करण्याचा पॅटर्न नगर जिल्ह्यात अवलंबण्यात आला. मात्र, हे सुशोभिकरण करताना आपले कनिष्ठ अधिकारी नेमक्या कुणाकडून देणग्या घेत आहेत? त्याचे निकष काय? या देणग्यांचा हिशोब काय? या काहीही बाबी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी पाहिलेला दिसत नाहीत. त्यातूनच पारनेरचे प्रकरण उद्भवले आहे असे दिसते.
पारनेर व निघोज पोलीस स्टेशनचे सुशोभिकरण करताना १९ जणांकडून देणगीस्वरुपात ६ लाख ५७ हजार रुपयांचे साहित्य मिळाले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या देणगीदारांची यादीच यासंदर्भातील अहवालात जोडण्यात आली आहे. या १९ जणांना पोलिसांनी कशाच्या आधारे आवाहन केले होते? याच व्यक्तींना देणगीची संधी का मिळाली? हे प्रश्नतर आहेतच. मात्र, हे साहित्य कोणत्या दुकानांतून खरेदी करण्यातआले? हाही प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांच्या अहवालानुसार पारनेर शहरातील सेजल कॉम्प्लेक्समधील साईकृपा प्लायवूड सेंटर या दुकानातून सुमारे सव्वा तीन लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. या दुकानाची एकूण सात बिले पोलिसांच्या अहवालात दिसतात. पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. पोलीस स्टेशनच्या सुशोभिकरणाबाबत तक्रार करणारे रामदास घावटे व बबन कवाद या दोघांचेही म्हणणे आहे की या नावाचे दुकानच पारनेरमध्ये नाही. मग ही बिले आली कोठून?
या दोघांनीही पारनेर नगरपंचायतकडे माहिती अधिकारातही विचारणा केली. त्यावर नगरपंचायतने सेजल कॉम्प्लेक्समध्ये अशा नावाच्या दुकानाची नोंद आढळत नाही, असे उत्तर दिले आहे. हा संशय केवळ एवढ्यापुरताच नाही. सदर फार्मची जी सात बिले आहेत त्या बिलांच्या तारखा व बिल क्रमांक यात प्रचंड विसंगती आहे. त्यामुळेच न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. पोलिसांनी दिशाभूल करणारा अहवाल दिला. पोलीस अधीक्षकांनी खुलासा करावा, असे खंडपीठाने सांगितले होते. त्यानंतर अधीक्षकांनी अहवाल चुकीचा असल्याचे मान्य करत फेरचौकशी करुन अहवाल सादर करण्याचे न्यायालयात मान्य केले आहे. आता पोलीस काय
अहवाल सादर करतात याची प्रतीक्षा आहे.
ज्या देणगीदारांकडून पोलिसांनी देणगी घेतली त्यांचे शपथपत्रही पोलिसांनी घेतले आहे. यातील अनेकांनी आम्ही देणगी दिली असल्याचे या शपथपत्रांत म्हटले आहे. मात्र, शपथपत्रांतील बहुतांश मजकूर हा एकसारखा आहे. या देणगीदारांपैकी अनेकांनी रामदास घावटे व बबन कवाद हे चुकीच्या तक्रारी करतात. प्रसिद्धीसाठी ते हा खटाटोप करतात, अशाप्रकारचे शेर मारलेले आहेत.
विशेष म्हणजे हे शेरेही अनेकांच्या शपथपत्रात एकसारखेच आहेच. एकसारखी शेरेबाजी कशी? असाही प्रश्नयाचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनबाबतही तक्रार
श्रीगोंदा शहरातील पोलीस स्टेशनचेही सुशोभिकरण करण्यात आले आहे.त्यात पोलीस स्टेशनसमोर पेव्हिंग ब्लॉग बसविलेले दिसतात. हे काम कोणत्या निधीतून झाले याची माहिती श्रीगोंदा पोलिसांकडे मागण्यात आली होती. त्यावर असे सुशोभिकरण झालेले नाही, असे उत्तर श्रीगोंदा पोलिसांनी दिले आहे. याबाबतही पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने श्रीगोंद्याचे मावळते पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांचेकडून वस्तूस्थिती जाणून घेतली असता ते म्हणाले, ‘पेव्हिंग ब्लॉग हे आमदारांनी त्यांचे निधीतून बसविले आहेत. त्यात आमचा खर्च झालेला नाही. इतर काही कामे ही मी स्वत: केली आहेत. त्याव्यतिरिक्त काहीही सुशोभिकरण झालेले नाही.’