वृत्तपत्रांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवू
By Admin | Published: August 8, 2014 12:20 AM2014-08-08T00:20:55+5:302014-08-08T00:23:17+5:30
संगमनेर : ग्रामीण भागातील वृत्तपत्रे व संपादकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
संगमनेर : ग्रामीण भागातील वृत्तपत्रे व संपादकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अमृतवाहिनी शिक्षण संकुलात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय संपादक संमेलनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर अध्यक्ष किसन हासे, प्रा. जवाहर मुथ्था, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, विभागीय माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, काही वर्षांपूर्वी न्यूज चॅनल्स सुरू झाल्याने प्रिंट मीडियावर अरिष्ट येईल, असे वाटत होते. परंतु त्याच्या उलट घडले. प्रिंट मीडियावर समाजाचा विश्वास आहे. ग्रामीण पत्रकारांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तांबे यांनी पत्रकारिता हे महत्वाचे क्षेत्र असून लोकशाही व राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर असल्याचे सांगितले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे रवींद्र बेडकिहाळ यांनी ग्रामीण पत्रकार व संपादकांच्या समस्या मांडल्या. पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू करावे, जिल्हा पत्रकार भवनाचा निधी १० ऐवजी ५० लाख करावा, अशा मागण्या मांडल्या. प्रास्ताविक हासे यांनी केले. विमल नलावडे, शशांक मराठे, मुथ्था, बेडकिहाळ, चंद्रशेखर बेहरे, डॉ. संतोष खेडलेकर, वंदना बंदावणे, अशोक वरूडे, अॅड. नानासाहेब शिंदे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन नेहा सराफ यांनी करून डॉ. नामदेव गुंजाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)