निलेश लंके यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही : राधाकृष्ण विखे पाटील
By साहेबराव नरसाळे | Published: June 15, 2023 06:05 PM2023-06-15T18:05:09+5:302023-06-15T18:05:40+5:30
आमदार निलेश लंके यांना राजकारणात खूप शिकण्याची गरज आहे. ते बालिश हरकती करीत राहतात.
अहमदनगर : आमदार निलेश लंके यांना राजकारणात खूप शिकण्याची गरज आहे. ते बालिश हरकती करीत राहतात. ते पहिल्यांदा निवडून आले आहेत. मला वाटतं त्यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही. त्यांनी बेताल वक्तव्य थांबविली पाहिजेत, अशी टीका महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.१५) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या जोडीदारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वारकऱ्यांवरील झालेल्या लाठीहल्ल्यात पारनेरमधील एक वारकरी जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून, लंके यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. याबाबत विखे यांना पत्रकारांनी विचारले असता, लंके यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही, असे वक्तव्य विखे यांनी केले.
नवीन वाळू धोरण झाल्यानंतर अनेक लोकांना वाळू मिळत नाही. याबाबत विखे यांना विचारले असता ते म्हणाले, वाळूबाबत अनेक वर्षांपासून किडलेली व्यवस्था अस्तित्वात होती. आता आम्ही ही व्यवस्था बदलेली आहे. पण मागणी आणि पुरवठा यातील तफावत का हे मला अद्याप समजलेले नाही. मागणी आणि पुरवठ्याबाबत अद्याप ताळमेळ बसलेला नाही. त्यामुळे प्रशासनाला याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. वारकऱ्यांचा डाटा आपल्याकडे आत्तापर्यंत कधीही नव्हता. आता ही माहिती प्रशासनाने घेतली असून, प्रशासनाने वारकऱ्यांना सुविधा पुरविल्या आहेत. वारकऱ्यांना हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे. त्यावर त्यांना कोणतीही मदत पुरविली जाईल, असे विखे यांनी सांगितले.
काँग्रेसची ताकद दोन जागांपुरतीच
काँग्रेसकडून होत असलेले जागांची मागणी अवास्तव आहे. राज्यात काँग्रेस पक्ष शिल्लक राहिलेला नाही. राज्यात पक्ष दिसत नाही. मात्र, त्यांचे ठराविक पुढारी दिसत आहेत. त्यांची ताकद फक्त दोन जागांपुरतीच आहे, अशा शब्दात विखे यांनी काँग्रेसवर टीका केली.