पारनेरमध्ये तरुणांच्या साथीने नीलेश लंके यांचा प्रस्थापितांना धक्का (विश्लेषण)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:23 AM2021-01-19T04:23:33+5:302021-01-19T04:23:33+5:30
पारनेर : बिनविरोध निवडणुकीला अनेक गावातील प्रस्थापित नेत्यांनी केलेल्या विरोधात आमदार नीलेश लंके यांनी उभ्या केलेल्या तरुणाईने धक्का दिला. ...
पारनेर : बिनविरोध निवडणुकीला अनेक गावातील प्रस्थापित नेत्यांनी केलेल्या विरोधात आमदार नीलेश लंके यांनी उभ्या केलेल्या तरुणाईने धक्का दिला. सत्तेत जा असा कानमंत्र मिळाल्याने लंके यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा प्रथमच ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश झाला. यातूनच राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण होऊन सेना, भाजपला धोबीपछाड दिली.
पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा आमदार नीलेश लंके यांनी आखलेल्या व्यूहरचनेमध्ये प्रस्थापित अडकत गेले. लंके यांनी बिनविरोधचा नारा दिला आणि स्वतःचे नवीन तरुण कार्यकर्ते बिनविरोधच्या निमित्ताने ग्रामपंचायतीमध्ये पोहोचविले. लोणी हवेली, वडझिरे, म्हसोबा झापसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोधला अडथळा आणणाऱ्या मातब्बर नेत्यांना तरुणांकडून पराभव पत्करावा लागला. निघोजमध्ये बिनविरोधला विरोध करणारे लंके गटाचे सरपंच ठकाराम लंके यांच्याविरोधात विखे गटाचे सचिन वराळ यांनी धुव्वा उडवून आठ जागा मिळवल्या. तिसऱ्या आघाडीच्या सुधामती कवाद यांच्याकडे सत्तेची चावी आली आहे.
सुपा, नारायणगव्हाण, जवळा, गांजीभोयरे, टाकळी ढोकेश्वर, किन्ही या ठिकाणी सत्तांतर झाले. शिवसेनेचे जिल्हा परिषद सभापती काशीनाथ दाते-पोखरी, रामदास भोसले-दरोडी, अलकुटी, राहुल शिंदे-रांजणगाव मशीद यांनी आपल्या गावावरील पकड कायम ठेवली. सुजित झावरे यांनी स्वतःच्या वासुंदे गावात सत्ता राखली. पण विरोधकांनी तीन जागा मिळवून झावरे यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी ग्रामपंचायत निवडणुकीपासून अलिप्त होते. कोणत्याही गावात हस्तक्षेप करायचा नाही ही त्यांची पद्धत होती. लंके यांनी याच पद्धतीला छेद देत स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक गावात लक्ष दिले आणि यश मिळविले. राष्ट्रवादीने ८७ पैकी तब्बल ७० ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लढती झाल्या होत्या. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरणाऱ्या निवडणुकीत आमदार लंके वरचढ ठरले आहेत.
-----
पारनेर तालुक्यातील ८८ पैकी ७० ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला असून, ५ ते ७ ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र यश मिळविले आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात रस्त्यावर उतरून केलेल्या कामाची पावती मतदारांनी दिली आहे.
- नीलेश लंके,
आमदार, पारनेर-विधानसभा मतदारसंघ