निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार निशाणा; कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:36 PM2024-04-01T16:36:23+5:302024-04-01T16:37:30+5:30
पाथर्डी येथील सभेतून राशप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केलं. हे महायुतीचे नेते विचारतात.
अहमदनगर - लोकसभा निवडमुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता प्रचाराचा नारळ गावागावात फुटत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ५ उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यामध्ये नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, येथीलम मतदारसंघात सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगणार आहे. त्याचसाठी, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रा व प्रचाराचा शुभारंभ पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी येथे करण्यात आला. यावेळी, बोलताना लंकेंनी नाव न घेता सुजय विखेंवर टीका केली. तसेच, आत्तापर्यंत आपण तुम्हाला मुंबई दाखवली. आता, दिल्ली दाखवणार, असे म्हणत कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासनही दिलं.
पाथर्डी येथील सभेतून राशप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केलं. हे महायुतीचे नेते विचारतात. पण त्यापेक्षा त्यांनी दहा वर्षांमध्ये काय केलं हे सांगितलं. कोरोनाची महामारी आली. या महामारीत त्यांनी जनतेला टाळ्या वाजवायला सांगितलं. या महामारीत ५० लाख लोकांचा जीव गेला. त्यावर सरकार बोलत नाही.". तर, आपल्यातून काही सरदार तिकडे गेले. तिकडे गेलेल्या सरदारांना दिल्लीमध्ये सहाव्या रांगेमध्ये स्थान मिळालं, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी गटावर नाव न घेता केली. तर, निलेश लंके यांनीही नाव न घेता सुजय विखेंना लक्ष केले. तसेच, कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासनही दिलं.
मोहोटादेवीचं दर्शन घेऊन आपण स्वाभीमान जनसंवाद यात्रेची सुरूवात केली असून नगरच्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन आपण या यात्रेचा समारोप करणार आहोत, त्यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निलेश लंकेंनी दिली. आपल्या भागातील लोकांचे प्रश्न, मतदारसंघातील वेगेवगळ्या अडचणींची माहिती घेऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दुष्काळी आणि बेरोजगारी या दोन प्रश्नांवर काम करणार असून तरुणाईच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे निलेश लंकेंनी म्हटले. तसेच, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे आहेत, काम आपण करायचे आणि नारळ त्यांनी फोडायाचा, अस काम चालतं. शेतकऱ्यांना वेढीस धरलं जातं, अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. स्वत: काचेच्या घरात राहतात आणि दुसऱ्याच्या घरावर दगड टाकतात, असे म्हणत विखे पाटलांवर लंकेनी निशाणा साधला.
हे देवीच्या दारातही आपली जहागिरी दाखवात. पण, आपण देवी मातेचा सच्चा भक्त आहे. देवीचं दर्शन घेतलं, आता डायरेक्ट दिल्ली. तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो दिल्लीला. मला अनेकजण म्हणतात अधिवेशन काळात किती लोकं आणतो रे, २०० ते ४०० लोकं घेऊन जातो मी अधिवेशनाला. आजपर्यंत तुम्हाला कोणी संसद दाखवली का, आता मी सगळा लोंढाच घेऊन जातो दिल्लीला, असे म्हणत लंकेंनी कार्यकर्ते व मतदारांना दिल्लीवारीचे आश्वासन दिलं. तसेच, मी जे बोलतो ते करतो, आणि जे करतो तेच बोलतो. भविष्यात मला संधी दिल्यास प्रत्येक तालुक्यात MIDC उभी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. बेरोजगारी कमी झाली पाहिजे, तरुणांना काम मिळालं पाहिजे, असे लंकेंनी म्हटले.