निंबळकचा पाणीप्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:01+5:302021-08-22T04:24:01+5:30
निंबळक : निंबळक (ता. नगर) येथील पाणीसाठा वाढवून मिळावा, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी राज्यमंत्री अदिती तटकरे ...
निंबळक : निंबळक (ता. नगर) येथील पाणीसाठा वाढवून मिळावा, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी राज्यमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. पुढील आठवड्यात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, असे आश्वासन तटकरे यांनी दिले.
निंबळक येथे जवळपास वीस हजारांच्या पुढे लोकवस्ती आहे. एमआयडीसीमुळे लोकवस्ती वाढत आहे. सध्याचा पाणीपुरवठा अतिशय कमी स्वरूपात आहे. त्यामुळे नागरिकांना दहा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळते. जलवाहिनी नादुरुस्त होणे, विजेचा प्रश्न निर्माण झाला तर वीस दिवस पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
याबाबत सरपंच प्रियंका लामखडे यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे पाणी वाढवून मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. या पत्राचा आधार घेत निलेश लंके, अजय लामखडे यांनी राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी पुढील आठवड्यात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.