निघोज : रामदास घावटेंची तडीपारी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 02:06 PM2019-05-25T14:06:37+5:302019-05-25T14:06:41+5:30
जवळे (ता.पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांची तडीपारी उप- विभागीय दंडाधिकारी यांनी रद्द केली.
निघोज : जवळे (ता.पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांची तडीपारी उप- विभागीय दंडाधिकारी यांनी रद्द केली. पारनेर पोलिसांच्या प्रस्तावानुसार व जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पडताळणी अहवालानंतर सहा महीन्याकरीता अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्यांच्यावरील या कारवाईमुळे विविध स्तरांतून जिल्हा प्रशासनावर टिका झाली होती. तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, महीला व युवकांनी या घटनेचा निषेध करत मोर्चा काढून पारनेर तहसिलदारांना निवेदन दिले होते.
प्रांत अधिका-यांनी या प्रकरणाच्या प्रस्तावाचे पुनर्रलोकन केल. त्यामध्ये जिल्हा पोलिस प्रशासनाने दिलेल्या पडताळणी अहवालात, घावटे यांनी त्यांच्या बाजुने दिलेला बचावात्मक खुलासा आणि त्यांचे सर्मथनात परिसरातील विविध ग्रामभांचे ठराव याबाबतची माहीती पोलीसांनी लपवून ठेवली असल्याचे त्यांना निर्दशनास आले तसेच त्यांचे वरील गुन्हे गंभीर स्वरूपाचे नाहीत. घावटे यांनी त्यांचे बाजूने दिलेले म्हणने पुर्णपणे खोटे असल्याचा दावा पोलीसांनी करताना, तो एक अडदांड, धाडसी , खुनशी, दुसाहसी, गुन्हेगारी प्रवृत्तीचा, दहशत, दादागीरी, भिती निर्माण करणारा इसम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे समाजातील लोकांच्या मालमत्तेला, जिवीताला व सामाजिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालेला असल्याने व त्याचेकडून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याशिवाय आळा बसणर नाही अशी शिफारस जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली होती. म्हणून जिल्हा पोलिस प्रशासनाच्या या अहवालानुसार प्रांताधिकारी यांनी हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्तावीत कालावधी दोन वर्षांऐवजी कमी करून सहा महिन्यांसाठीचा आदेश केला होता.
परंतु घावटे यांच्यावरील कारवाई वादग्रस्त ठरल्यामुळे प्रांताधिकारी यांनी या प्रस्तावाचे पुनर्रअवलोकन केले. त्यामध्ये त्यांना वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या पडताळणी अहवालात काही शंकास्पद बाबी आढळून आल्या. याबाबतच्या झालेल्या निकालपत्रात दुरुस्तीचे सुचनापत्र काढून रामदास घावटे यांना हद्दपारीच्या कारवाईतून वगळले.
जिल्हा पोलीस प्रशासनाने सुडभावनेतुन व तडीपार करण्याच्या हेतुने खोटा व दिशाभुल करणारा पडताळणी अहवाल प्रांत अधिका-यांकडे पाठविल्याने ही कारवाई झाली. पोलिस खात्यातील गैरकारभार उघड केल्याच्या रागातून पोलिसांनी हा प्रस्ताव तयार केला होता. तसेच माज्यावरील नोंद असलेले तीनही गुन्हे खोटे आहेत. पोलिसांनी कायदा हातात आहे म्हणून त्याचा असा दुरूपयोग करणे योग्य नाही. - रामदास घावटे