नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:00+5:302021-03-31T04:21:00+5:30

सोमवारी (दि.२९) रोजी एकाच दिवसात ६६ कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. २० ते ३० मार्च दरम्यान तालुक्यात ...

Nine shops sealed for violating rules | नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ दुकाने सील

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ दुकाने सील

सोमवारी (दि.२९) रोजी एकाच दिवसात ६६ कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. २० ते ३० मार्च दरम्यान तालुक्यात २८६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३ हजार ४९७ वर पोहोचली आहे. तर सुमारे ३७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या आदेशाने मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी व मंगळवारी बाजारपेठेत कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नऊ दुकानांवर कारवाई करून आस्थापनांना सात दिवसांसाठी सील ठोकले आहे. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने शहरातील विविध भागात औषध फवारणी सुरू केली आहे.

हॉटेल, बसस्थानक, ठराविक दुकाने, चहाची दुकाने, चौक आदी सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे, या ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. शाळा, महाविद्यालयासमोर तसेच बसस्थानक परिसरात विद्यार्थी घोळक्याने उभे राहून एकप्रकारे कोरोनाला निमंत्रण देत आहेत. तर अवैध वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनात, नियम धाब्यावर बसवून प्रवाशांना वाहनात दाटीवाटीने बसविले जात आहे. एक प्रकारे शहरी भागातून ग्रामीण भागात कोरोना संसर्ग पोहोचण्याचे काम ही वाहने करत आहेत.

...........

गत दहा दिवसांतील कोरोना बाधितांची संख्या

२० मार्च ३१,

२१ मार्च १४,

२२ मार्च १५,

२३ मार्च १०,

२४ मार्च २९,

२५ मार्च ७१,

२६ मार्च ०२,

२७ मार्च २१,

२८ मार्च १२,

२९ मार्च ६६

३० मार्च १५

.............

कोट

कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतः कोरोनापासून सुरक्षित राहून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. गर्दी करणे टाळावे तसेच कोरोना काळातील नियम पाळून प्रशासनाला कोरोना हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे. - अर्चना पागिरे, तहसीलदार

फोटो शेवगाव,१,२

Web Title: Nine shops sealed for violating rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.