बिबटयाच्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:46 PM2019-09-05T12:46:41+5:302019-09-05T12:46:41+5:30
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) तालुक्यातील कुरणपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
श्रीरामपूर - श्रीरामपूर (जि. अहमदनगर) तालुक्यातील कुरणपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. दर्शन चंद्रकांत देठे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
दर्शन देठे हा जवळच वस्तीवर असलेल्या गणपतीच्या आरतीसाठी गेला होता. आरती झाल्यानंतर रात्री तो घरी परतत होता. रात्री शेतातून बिबट्या अचानक बाहेर आला आणि कोणाला काही कळण्याच्या आतच बिबट्याने दर्शनवर हल्ला केला. त्याला पाचशे-सहाशे फूट ओढत नेले. अश्विनी देठे हिने आरडाओरड केली. त्यानंतर बिबट्याने दर्शनला ऊसात तसेच सोडले. जमलेल्या नागरिकांनी दर्शनला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
कोल्हार येथून फत्त्याबादकडे येत असताना उदयन बाबासाहेब आठरे (वय २४) आणि ब्रजेश दिलीप आठरे (वय१३) यांना कोल्हार-बेलापूर रोडवर बिबट्या आडवा गेला. त्यामुळे या पळापळीत दोघेही जखमी झाले. दोघांनाही प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेलापूर-कोल्हार रोडवरील ताके वस्तीनजीक बुधवारी सायंकाळी पाच बिबट्यांचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.मात्र त्याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. या निषेधार्थ आज कुरणपूरचे ग्रामस्थ रास्तारोको करत आहेत.