नितीन आगेच्या मारेक-यांना शिक्षा झाली पाहिजे; रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 08:32 PM2017-12-25T20:32:12+5:302017-12-25T20:32:44+5:30
या केसमधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. नितीनच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मयत नितीन आगेचे वडील राजू आगे यांंना दिले.
देवळाली प्रवरा : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा (ता़ जामखेड) गावात अकरावीचा विद्यार्थी नितीन आगे याची भरदिवसा हत्या करण्यात आली. मात्र साक्षीदार फितूर झाल्याने नितीन आगेचे मारेकरी जरी निर्दोष सुटले असे असले, तरी त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय नितीन आगेला न्याय मिळणार नाही. या केसमधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. नितीनच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मयत नितीन आगेचे वडील राजू आगे यांंना दिले.
बांद्रा येथील संविधान निवासस्थानी रविवारी नितीन आगेचे वडील राजू आगे यांनी मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन दिवंगत नितीन आगेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. राजू आगे यांच्या कुटुंबाला खर्डा गावात धोका आहे. त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी रिपाइंतर्फे दिवंगत नितीन आगेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून अधिक एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आठवले यांनी राजू आगे यांना दिले. कोपडी व खर्डा एकाच जिल्ह्यातील या दोन्ही केसमधील वेगवेगळे निकाल आल्यामुळे समाजात संदेश चुकीचा जात आहे. त्यामुळे नितीन आगेच्या मारेकºयांना फाशी झाली पाहिजे. या केसमधील फुटीर साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे आठवले म्हणाले. नितीन आगे हा केवळ राजू आगे यांचा मुलगा नाही, तर आता तो संपूर्ण आंबेडकरी समाजाचा मुलगा आहे. सर्व समाज आगे कुटुंबाच्या पाठिशी आहे, असे आश्वासन आठवले यांनी दिले. यावेळी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, हेमंत रणपिसे, नगरसेवक सुरेंद्र थोरात, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
आठवले ३१ तारखेला नगरच्या दौ-यावर
खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील फितूर साक्षीदारांविरोधात सरकारच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात याचिक दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ३१ डिसेंबर रोजी नगर जिल्ह्याच्या दौ-यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.