इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई भाजपात, मंत्री महोदयांच्या उपस्थितीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 02:48 PM2023-01-09T14:48:47+5:302023-01-09T15:09:48+5:30
राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाले.
अहमदनगर - आपली हटके कीर्तन शैली आणि सोशल मीडियामुळे घराघरात पोहोचलेल्या इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी सरपंचपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. त्यानंतर, आता दोन दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत नारळ या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, २२७ मतांनी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. आता, त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं आहे.
राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाले. भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीमधील चढाओढ यात पाहायला मिळाली. त्यावेळी, संगमनेर तालुक्यात निळवंडे ग्रामपंयाचत निवडणुकीत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरंपचपदी निवडून आल्या. शशिकला पवार यांनी निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यात गावकऱ्यांनी विश्वास दाखवत शशिकला यांना विजयी केलं आहे. मात्र, आता त्यांनी थेट भाजपात प्रवेश केला आहे.
इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी होत असते. विनोदी शैलीनं आणि उदाहरणांनी प्रवचनातून समाजप्रबोधन करण्याची इंदोरीकर महाजारांची पद्धत अनोखी आहे. राज्यात विविध गावांमध्ये त्यांची दररोज प्रवचनं होत असतात आणि त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळते. आता इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई यांनी राजकारणात एन्ट्री घेतली असून सरपंचपदी विराजमान होताच त्यांनी सत्ताधारी भाजपसोबत जाणं पसंत केलं आहे. दरम्यान, निळवंडे गाव हे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील असून शशिकला पवार यांनी भाजपात प्रवेश केल्याने थोरातांना हा मोठा धक्का मानला जात आहे.