द्राक्षं घेता का द्राक्षं, फक्त १० रुपये किलो; व्यापाऱ्यांची नगरकडे पाठ, शेतकरी संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 03:25 PM2022-05-19T15:25:24+5:302022-05-19T15:28:21+5:30
सध्या व्यापारी द्राक्षे खरेदी करण्यासाठी बागेकडे फिरकायला तयार नाहीत, असे चित्र आहे. आठ ते दहा रुपये किलो दरानेही व्यापारी माल खरेदीला इच्छुक नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत आहे. द्राक्ष खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची अक्षरश: विनवणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मालासह बागेची छाटणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. जिल्ह्यात सुमारे २० ते २५ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. यंदा सरासरी १५ ते १७ टन एवढे विक्री उत्पादन झाले. मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात किलोमागे ५० रुपये दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उशिराने बागेची छाटणी केली होती. मात्र असे काहीही घडले नाही.
नाशिकमधील मालाची मागील महिन्यातच पूर्णपणे विक्री झालेली होती. त्यामुळे जिल्ह्यातील मालाला व्यापाऱ्यांची पसंती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या व्यापारी द्राक्षे खरेदी करण्यासाठी बागेकडे फिरकायला तयार नाहीत, असे चित्र आहे. आठ ते दहा रुपये किलो दरानेही व्यापारी माल खरेदीला इच्छुक नाहीत.
लोणी येथील द्राक्ष बागायतदार संघटनेचे प्रमुख नेते सुनील विखे यांची पाच एकर द्राक्षबाग आहे. त्यांचा माल काढणीला आला असून, पुढील आठवड्यात तो खराब होणार आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी नकार दिल्यामुळे ते स्वत: नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. तेथील वाईन कंपन्यांना माल खरेदीसाठी त्यांनी गळ घातली आहे. मात्र दहा रुपये किलो दराने आपणच कंपनीपर्यंत माल पोहोच करावा. तोडणी व वाहतुकीचा भार उचलावा, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. यातून एकही रुपया हातात पडणार नाही, असे विखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
उक्कलगाव (ता. श्रीरामपूर) येथील इंद्रनाथ थोरात यांनी यंदा रासायनिक खते व औषधांची बिलेही द्राक्ष उत्पादकांना अदा करता येणार नाहीत, अशी माहिती दिली. १७० दिवस माल बागेत राहिला तर तो खराब होतो. पुढील वर्षी त्यामुळे उत्पादनाला फटका बसतो. आज बागेतच माल टाकून देण्याची वेळ आल्याचे थोरात म्हणाले.
या गोष्टींमुळे बसला फटका
सरकारने दीड महिन्यापूर्वीच द्राक्षनिर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे निर्यातक्षम मालही स्थानिक बाजारात पडून राहिला. त्याचबरोबर मार्च महिन्यातच पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे द्राक्षांची नैसर्गिक वाढ कमी झाली. माल पक्व झाल्यामुळे घडातील द्राक्षांची गळती होते. त्यामुळे व्यापारी माल खरेदी करायला इच्छुक नाहीत, असे चित्र आहे.