कालव्यांना नाही, गोदावरीत पाणी सोडल्याने नागरिक संतप्त
By सचिन धर्मापुरीकर | Published: July 13, 2024 02:20 PM2024-07-13T14:20:17+5:302024-07-13T14:21:31+5:30
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अ
कोपरगाव (जि. अहमदनगर) : नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून कालव्यांऐवजी गोदावरी नदीत पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह कोपरगाव शहरवासीय संतप्त झाले आहेत. शहराला बारा दिवसांआड पाणी मिळते आहे, तर पावसाअभावी शेतकरी चिंतेत असताना, गोदावरीत पाणी सोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्येही अद्याप अपेक्षीत पाण्याची आवक झालेली नाही. परंतू नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक शहर व निफाड तालुक्यात झालेल्या पावसामुळे बंधारा भरला आहे. त्यामुळे २०० क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे. गोदावरी नदीत सोडलेले पाणी उजव्या व डाव्या कालव्यांना सोडले असते, तर शेतीसह शहराचा पाणी प्रश्न काही अंश सुटला असता. गोदावरीत पाणी सोडल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अनेकांच्या बोअरवेल व वहिरींनी तळ गाठलेला आहे. विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव खेड्यांना पिणी पुरवठा करणारे पाणी साठवण तलाव देखील कोरडे आहेत. कोपरगाव शहरातील नागरिकांना १२ दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असताना, डोळ्यादेखत गोदावरीतून पाणी वाहून जात आहे.
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते. पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले असते. नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता. परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर व नागरिकांवर जणू केल्याची भावना निर्माण झाली आहे.
नांदूर मधमेश्वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून कोपरगाव शहरवासीयांसह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाटबंधारे विभागाच्या या कृतीचा जाहिर निषेध व्यक्त करतो.
-सुनिल अंबादास देवकर, माजी सभापती, कोपरगाव