जिल्हा परिषद सीईओ विश्वजित माने यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 03:52 PM2019-07-08T15:52:38+5:302019-07-08T16:50:21+5:30
ठरावाला सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा
अहमदनगर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी हा ठराव मांडण्याची घोषणा गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत केली होती. आजच्या सभेत त्या ठरावाला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.
माने यांनी जिल्ह्याच्या विकासात खीळ घातली. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर व्हायलाच हवा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्याला सर्वांनी बाके वाजवून पाठिंबा दिला. माने यांच्यामुळे कामं झाली नाहीत. त्यांनी बदल्यांमध्ये गैरसोयी केल्या. पशुसंवर्धन विभागाच्या बदल्या तीन दिवस चालल्या. त्यामागे काय कारण?, असाही सवाल सदस्यांनी विचारला.
भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले, 'माने यांनीच ही वेळ ओढवून घेतली. लोकप्रतिनिधींना माने यांच्यामुळे कामे करता येत नाही. सीईओ यांनी अपंग जवानांच्या पत्नींना सोयीची बदली देता येत असतानाही दिली नाही. महिलेला न्याय मिळावा, अशी सर्वांची भावना आहे. माने यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. सदस्यांनी सांगितलेली कामे अधिकारी करीत नाहीत. मात्र त्यांची कामे रात्री 11 वाजेपर्यंत करतात. असा दूजाभाव नसावा. या ठरावाला आमचा पाठिंबा आहे.'
पालकमंत्री राम शिंदे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्यामध्ये माने यांच्या वरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अखेर विखे यांनी मांडलेला अविश्वास ठराव सर्व सदस्यांनी मंजूर केला. या ठरावामुळे पालकमंत्री राम शिंदे यांची जिल्हा परिषदेत पिछेहाट झाली आहे. माने यांच्यावर अविश्वास ठराव येणार असल्याची कल्पना असल्यानेच पालकमंत्री यांनी दोन दिवसांपूर्वी निर्देश देऊन माने यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.