मीटर नाही, तरीही आले वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 05:41 PM2019-06-07T17:41:22+5:302019-06-07T17:42:03+5:30
वीज मीटर जोडलेले नाही, वीज जोडणीसुद्धा दिलेली नसतानाही महावितरणने गडदवाडी येथील ग्राहकांना वीज बिले देण्याचा प्रकार केल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
विनोद गोळे
पारनेर : वीज मीटर जोडलेले नाही, वीज जोडणीसुद्धा दिलेली नसतानाही महावितरणने गडदवाडी येथील ग्राहकांना वीज बिले देण्याचा प्रकार केल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पारनेर-चिंचोली रस्त्याजवळील घाटात ही गडदवाडी आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने थेट या गावात जाऊन पाहणी केली असता गावात विजेचे खांब उभारण्यात आल्याचे दिसून आले. या खांबावरून वीज पुरवठा मिळून घरगुती वीज मीटर घेण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या पारनेर कार्यालयात मागील मे महिन्यात अर्ज केले. अर्जानंतर महिना होऊनही वीज जोडणी झाली नाही. वीज जोडणी लांबच राहिली. मात्र भाऊसाहेब पडवळ, बबन रभाजी कोठकर, डी. के. येवले, बापू कौठकर, सुखदेव कौठकर या ग्राहकांना थेट प्रत्येकी ३०९ रूपयांचे वीज बिल महावितरणने पाठविले. वीज मीटर नसतानाच वीज बिले हातात पडल्यावर या शेतकऱ्यांना धक्काच बसला.
३१ युनिट वापराचे ३०९ रूपये बिल
महावितरण अंदाजे रिडींग देऊन वीज वापर बिल देत असल्याचा प्रकार अनेकदा घडतो. गडदवाडीत मात्र ग्राहकांना वीज जोडणी नसताना देखील ३१ युनिट वापर दाखवून ३०९ रूपये वीज बिल देण्यात आले आहे. वीज बिल विभागाच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकांना नाहक भुर्दंड बसत आहे.
आम्हाला अजून वीज जोडणी दिलेली नसताना वीज बिले दिली आहेत. हा गंभीर प्रकार असून वीज बिल विभाग सांभाळणाºयाविरूद्ध याबाबत दंड करून कारवाई करावी.
- भाऊसाहेब पडवळ, शेतकरी, गडदवाडी.
गडदवाडी कोणत्या विभागात येते याची माहिती घेऊन काय झाले ते पाहतो.
- प्रशांत आडभाई, उपअभियंता, महावितरण, पारनेर