जिल्हा परिषदेत अभ्यागतांना ‘नो एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:31+5:302021-03-31T04:21:31+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हा परिषदेमध्ये आता अभ्यागतांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. खूपच आवश्यक ...
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हा परिषदेमध्ये आता अभ्यागतांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. खूपच आवश्यक काम असेल तरच प्रवेश, अन्यथा अभ्यागतांनी आपले कागदपत्र किंवा संदेश टपालात देण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे त्याचा संसर्ग जिल्हा परिषदेतही होऊ नये यामुळे प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गेल्या तीन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी जेव्हा जिल्हा परिषद उघडली तेव्हा तिचे तीनही गेट बंद होते. अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात येत होता. आवश्यक काम असेल तरच प्रवेश होता. त्यातही लोक समूहाने आले असतील तर त्यातील एकाला आत सोडले जात होते. इतर निवेदने किंवा कागदपत्रे असतील तर ते टपालात जमा करून घेतले जात होते.
जिल्ह्यातील अभ्यागतांनी जिल्हा परिषदेत येण्याचे शक्यतो टाळावे. शक्यतो फोनवर संबंधित विभागाशी संपर्क करून कामकाज उरकण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक नसेल तर काही दिवस काम पुढे ढकलून कोरोना स्थिती आटोक्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेत यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
---------
फोटो - जिल्हा परिषद इमारत