ना सुविधा, ना सुरक्षेची साधने, तरीही परिचारिकांचा कोरोनाविरोधात लढा; ग्रामीण भागातील परिचारिकांची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 02:59 PM2020-05-12T14:59:53+5:302020-05-12T15:00:38+5:30
ना सुविधा, ना सुरक्षेची साधने फक्त लोकं कोरोना वॉरियर्स म्हणतात, तेव्हढेच काय ते सुख. बाकी कोरोना संसर्गाची टांगती तलवार घेऊनच ग्रामीण भागातील परिचारिका कोरोनाविरोधात लढा देत आहेत. पदरमोड करुन मास्क व सॅनिटायझर घेऊन स्वत:च्या सुरक्षेसह इतरांचीही सुरक्षा करीत आहोत, अशी व्यथा ग्रामीण भागातील परिचारिका मांडत आहेत.
साहेबराव नरसाळे ।
अहमदनगर : ना सुविधा, ना सुरक्षेची साधने फक्त लोकं कोरोना वॉरियर्स म्हणतात, तेव्हढेच काय ते सुख. बाकी कोरोना संसर्गाची टांगती तलवार घेऊनच ग्रामीण भागातील परिचारिका कोरोनाविरोधात लढा देत आहेत. पदरमोड करुन मास्क व सॅनिटायझर घेऊन स्वत:च्या सुरक्षेसह इतरांचीही सुरक्षा करीत आहोत, अशी व्यथा ग्रामीण भागातील परिचारिका मांडत आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेत ८२३ तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत ३४५ अशा जिल्ह्यात १ हजार १६८ परिचारिका थेट कोरोना विरोधातील लढ्यात अग्रभागी आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत येणा-या ३४५ परिचारिका रुग्णालयांमध्ये सेवा बजावत आहेत. रुग्णालयात येणा-या कोरोना रुग्णांशी त्यांचा थेट संपर्क येतो. त्यामुळे त्यांना पीपीई किट व इतर सुरक्षेची साधने देण्यात आली आहेत.
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सेवेतील परिचारिकांना आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये सेवा बजावत आहेत. त्याशिवाय त्यांना आशा कर्मचा-यांसोबत घरोघर जाऊन सर्वेक्षण करणे, संशयित रुग्णांना क्वारंटाईन करणे आणि सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील तर उपचार करणे, त्यांचे रक्ताचे नमुने घेणे अशी अनेक कामे करावी लागतात. त्याशिवाय नियमित कामे, अहवाल पाठविण्याची जबाबदारीही परिचारिकांना पार पाडावी लागते. कोरोनाची ड्युटी करण्यासाठी प्रारंभी या परिचारिकांना ‘युज अॅण्ड थ्रो’ मास्क व सॅनिटायझर एकदाच दिले होते. हे मास्क व सॅनिटायझर संपल्यानंतर परिचारिकांनी पदरमोड करुन कापडी मास्क व सॅनिटायझर विकत घेतले आहे. त्यावर या परिचारिकांचा लढा सुरु आहे.
कामाचा अभिमान वाटतो
गावात बाहेरुन, किंवा इतर जिल्हा, राज्य, परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या नोंदी ठेवणे, त्यांना होम क्वारंटाईन करणे, आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार करणे, प्रसूती करणे, गावात सर्वेक्षण करणे, विलगीकरण कक्षात ठेवलेल्या व्यक्तींची सुविधा पुरविणे, अशी कामे परिचारिकांना करावी लागत आहेत. नियमित कामांबरोबरच कोरोनाच्या अतिरिक्त कामाचा ताणही परिचारिकांवर वाढला आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही कुरकूर न करता देशसेवा करीत असल्याचा अभिमान वाटतो, असे परिचारिका सांगतात.
परिचारिकांना आरोग्य केंद्रांच्या निधीतून मास्क व सॅनिटायझर पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जर काही परिचारिकांनी स्वत: मास्क घेतले असतील तर तो खर्चही त्यांना आरोग्य केंद्राच्या निधीत टाकता येईल. ग्रामीण भागातील परिचारिका थेट रुग्णांच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे त्यांना पीपीई किटसारखी सुरक्षेची साधने दिली नाहीत. इतर सुविधा व सुरक्षेची साधने पुरविली आहेत़, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ़ संदीप सांगळे यांनी सांगितले....
प्राप्त साधनांमध्ये आम्ही कोरोनाची ड्युटी करीत आहोत़ स्वत:चे व इतरांचे संरक्षण अशा दुहेरी भूमिकेत राहून आम्हाला जबाबदारी पार पाडावी लागत आहे. कुटुंबीय व परिसरातील लोकं आम्हाला ‘कोरोना वॉरियर्स’ म्हणतात, यातच सारे सुख आले. लोकं कौतुक करतात म्हणून देशाला वाचविण्यासाठी ‘कोरोना’विरोधातील लढ्यात आम्हाला प्रेरणा मिळते, असे जिल्हा परिषद परिचारिका सोसायटीच्या अध्यक्षा इंदू गोडसे यांनी सांगितले.