बिल दाखविल्याशिवाय इंजेक्शन दिले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:21 AM2021-04-27T04:21:26+5:302021-04-27T04:21:26+5:30

अहमदनगर : रेमडेसिविर, टोसिलिझुमँबसारखी महागडी इंजेक्शन कोठून आणली, त्याचे बिल दाखविल्याशिवाय उपचार घेत असलेल्या रुग्णाला त्या इंजेक्शनचा डोस ...

No injection will be given without showing the bill | बिल दाखविल्याशिवाय इंजेक्शन दिले जाणार नाही

बिल दाखविल्याशिवाय इंजेक्शन दिले जाणार नाही

अहमदनगर : रेमडेसिविर, टोसिलिझुमँबसारखी महागडी इंजेक्शन कोठून आणली, त्याचे बिल दाखविल्याशिवाय उपचार घेत असलेल्या रुग्णाला त्या इंजेक्शनचा डोस दिला जाणार नाही, असा निर्णय नगर येथील इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने घेतला आहे. या निर्णयाची राज्यातील सर्व डॉक्टरांनी अंमलबजावणी केल्यास रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनचा काळाबाजार आटोक्यात येईल, असे निवेदनच इंडियन मेडिकल असोसिएशनने जारी केले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, माजी अध्यक्ष डॉ. निसार शेख यांनीच पत्रकान्वये ही माहिती दिली आहे. याबाबत सर्व डॉक्टरांची सोमवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या रेमडेसिविर व टोसिलिझुमँब या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रेमडेसिविरची एक व्हायल ४० हजार रुपयांना, तर टोसिलिझुमँबचे एक इंजेक्शन १ लाख ४० हजार रुपयांना काळ्याबाजारात उपलब्ध असल्याची आमची ऐकीव माहिती आहे. सरकारचे कडक निर्बंध आणि काटेकोर नियम असतानादेखील काळ्याबाजारात ही इंजेक्शन्स कोठून मिळतात, असा सवालही डॉक्टरांनी केला आहे.

जिल्ह्यामध्ये येणारा सर्व साठा व पुरवठा हा फक्त जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन यांच्याकडूनच होऊ शकतो. जर सर्व इंजेक्शन सरकारी कोट्यातून फक्त कोविड सेंटरलाच मिळत असतील तर बाहेर कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन मिळणार नाहीत, अशाच या नियमातून स्पष्ट होते. मात्र, काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ते सहज उपलब्ध होते, तर काहींना कोटा सिस्टिमने मिळत आहे. काही ठिकाणी मूळ औषधाऐवजी त्यामध्ये दुसरेच काहीतरी (पाणी किंवा स्टेरॉईड) भरून विकण्याचे उद्योग होऊ शकतात. अशाच प्रकारचे एक रॅकेटदेखील पकडले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. रेमडेसिविरऐवजी जर दुसरेच काही औषध भरलेले असल्यास रुग्णाच्या जीवितास धोका देखील होऊ शकतो. यापासून रुग्णाला फायदा होण्याची शक्यता नाही. उलट नुकसानच अधिक होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने अधिकृत बिलाशिवाय आणलेले इंजेक्शन्स हेच रुग्णाला देण्याचा धोका हॉस्पिटल पत्करू शकत नाही. त्यामुळेच इंजेक्शनचे बिल असल्याशिवाय कोणत्याही कोविड सेंटरने बाहेरून आणलेले इंजेक्शन (बिलाशिवाय) स्वीकारू नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आयसीएमआरने दिलेल्या निष्कर्षाप्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शन फारसे परिणामकारक नाही. ते मोजक्या रुग्णांमध्ये नऊ दिवसांच्या आत दिल्यासच ते थोडेफार प्रमाणात उपयोगी पडते, असे पत्रकात म्हटले आहे.

Web Title: No injection will be given without showing the bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.