विखे पाटलांकडून निमंत्रण नाही, तरीही पवार अन् गडकरी एकाच मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 03:08 PM2021-10-01T15:08:28+5:302021-10-01T15:10:41+5:30
विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांनाच परिचीत आहे. त्यातही, शरद पवार यांचे अहमदनगर जिल्ह्यात जातीने लक्ष असते. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी सुजय विखेंना आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने ते भाजपात गेले होते.
अहमदनगर - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे नगरमधील एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे भाजपा नेते खासदार सुजय विखे यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. मात्र, शरद पवार यांना थेट नितीन गडकरी यांच्याकडूनच कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमास विखे पाटील फाऊंडेशनतर्फे पवारांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचे सुजय विखे यांनी सांगितले.
विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांनाच परिचीत आहे. त्यातही, शरद पवार यांचे अहमदनगर जिल्ह्यात जातीने लक्ष असते. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी सुजय विखेंना आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने ते भाजपात गेले होते. त्यामध्ये, त्यांनी विजयही मिळवला. आता, विखे फाऊंडेशनतर्फे आणि सुजय विखेंच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडत आहे.
केंद्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या चार महामार्गांचे भूमिपूजन आणि काम पूर्ण झालेल्या चार रस्त्यांचे लोकार्पण शनिवारी सकाळी होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमासंबंधी पत्रकारांना माहिती दिली. या कामासोबतच गडकरी नगर जिल्ह्याच्या विकासासंबंधी आणखी काही घोषणा करणार आहेत. त्यांच्याकडे आणखी काही मागण्या करण्यात येणार असल्याचेही विखे यांनी सांगितले.
शरद पवारांच्या उपस्थितीकडे लक्ष
जिल्ह्यातील या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे. पवार यांना गडकरी यांच्या सूचनेनुसार निमंत्रण गेले. त्यांनी येण्याचे मान्य केले आहे. पुण्याहून मोटारीने ते थेट कार्यक्रमच्या ठिकाणी येणार असून तो कार्यक्रम करून पुन्हा पुण्याला जाणार आहेत, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. तर गडकरी यांचे आगमन हेलिकॉप्टरने विळद घाटातील विखे पाटील फाऊंडेशनच्या हेलिपॅडवर होणार आहे.