ना टेस्टिंग, ना लसीकरण; तिसरी लाट कशी रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:21 AM2021-05-12T04:21:03+5:302021-05-12T04:21:03+5:30
राज्यभरात कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. राज्यात नगर जिल्हा वरच्या काही जिल्ह्यांमध्ये आहे. ...
राज्यभरात कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. राज्यात नगर जिल्हा वरच्या काही जिल्ह्यांमध्ये आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे हे रुग्ण कमी करण्यासाठीची यंत्रणा प्रशासनाकडे कमी असल्याचे जाणवते. मध्यंतरी प्रशासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण केले. यात कोरोनाची लक्षणे आहेत का याबाबत तपासणी करण्यात आली. तब्बल चोवीस हजार संशयित रुग्ण या सर्वेक्षणातून सापडले. मात्र, निम्म्याहून जास्त संशयित रुग्णांना तातडीने तपासणी करता आली नाही. कारण जिल्ह्यात कोरोना तपासणी किटचा तुटवडा होता. नंतर त्या उपलब्ध करण्यात आल्या. मात्र, कोरोना चाचणीसाठी नागरिकांना मोठी वाट पाहावी लागते. कोरोना चाचणीपेक्षा जास्त फरफट नागरिकांची लसीकरणासाठी होत आहे. ४५ वर्षांच्या पुढील नागरिक रोज केंद्रांवर रांगा लावत आहेत. मात्र, त्यांना आठ दिवस लस उपलब्ध होत नाही. यातून कोरोना वाढण्याचे हे प्रमाण समोर येत आहे. अठरा वर्षांपुढील लोकांना लसीकरण सुरू झाले आहे. मात्र त्यालाही अद्याप गती आलेली नाही. लसीकरण केंद्रांवर लस नाही. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करताना मोठ्या अडचणी येतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
-----------
जिल्ह्यातील एकूण रुग्ण - २२३३७४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -२७८६५
शहरातील रुग्ण - ५०००
ग्रामीण भागातील रुग्ण- २२०००
-----------
तारीखनिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या
१ एप्रिल -१३१९
१० एप्रिल - २२१९
२० एप्रिल - २७७५
३० एप्रिल - ३९५३
१० मे - ४०५९
----------------
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही
मागील वर्षी कोरोना लाटेमध्ये ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे तातडीने रुग्णाच्या संपर्कातील संशयितांना वेगळे करण्यात आले. मात्र, या लाटेत गावोगाव रुग्णांचे नातेवाईक तसेच संपर्कातील लोक फिरत आहेत. त्यांचे ट्रेसिंग वेळेवर होत नसल्याचे आढळत आहे.
-----------
लसीकरण नावालाच
ग्रामीण भागातील काही केंद्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लस नसल्याने ग्रामस्थांचा हिरमोड होत आहे. सकाळी दहा वाजता लसीकरण असले तर लोक पहाटे पाचपासून केंद्रांवर रांगा लावत आहेत. लस उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
--------------
आतापर्यंत झालेले लसीकरण
आरोग्य कर्मचारी - ४२८२८
फ्रंटलाइन वर्कर - १५५००
पंचेचाळीस वर्षांत पुढील सर्व - ४७६९३१
---------------
(डमी)(डमी)