बँकांच्या असहकार्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास रखडला; गुन्हेगारांकडून बँक खात्यांचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 02:24 PM2019-12-16T14:24:54+5:302019-12-16T14:25:36+5:30
सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यातील ५०० तक्रारींचा तपास रखडला आहे.
अरुण वाघमोडे ।
अहमदनगर : सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यातील ५०० तक्रारींचा तपास रखडला आहे. पोलिसांच्या मदतीसाठी बँकांना नियंत्रित करणारी अथवा आदेश देऊ शकणारी कुठलीच यंत्रणा कार्यरत नसल्याने तपासी अधिका-यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
९९ टक्के सायबर गुन्ह्यांत आॅनलाईन पैसे चोरतांना चोरटे बँक खात्यांचा वापर करतात. अशा गुन्ह्यांत पोलिसांच्या तपासाची सुरुवात तक्रारदार आणि गुन्हेगाराचा बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोडपासून होते. सायबर गुन्हेगार तक्रारदाराच्या बँक खात्यातून स्वत:च्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतात़ अथवा वेगवेगळे आमिष दाखवून बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले जाते. अशा स्वरुपाची फसवणूक झालेले तक्रारदार सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देतात. तक्रारदाराचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने सायबर टीम तपासाला सुरुवात करते. चोरट्याने फसवणुकीसाठी वापरलेल्या बँकेचा पत्ता आयएफएससी कोडवरून पोलिसांना समजतो.
अशावेळी पोलीस बंधित बँकेच्या शाखेला ई-मेल करून गुन्हेगाराने फसवणुकीसाठी वापरलेले बँक खाते गोठविण्यास (बंद) सांगतात़ ई-मेलला बँकेने प्रतिसाद दिला नाही तर फोन करूनही विनंती केली जाते. वारंवार रिमाइंडर मेल केले जातात. बँका मात्र पोलिसांच्या विनंतीला प्रतिसाद देत नाही. यामुळे तक्रारदाराला त्यांचे पैसे परत मिळण्यात अडचणी निर्माण होतात तसेच गुन्ह्यांचा पुढील तपासही रखडतो.
परराज्यातील बँक खात्यांचा सर्वाधिक वापर
च्आॅनलाईन फसवणुकीत येथील सायबर पोलिसांकडे दाखल असलेल्या ५०० तक्रार अर्जांमध्ये परराज्यातील बँक खात्यांचा वापर झाल्याचे समोर आले आहे. आॅनलाईन फसवणूक करणाºया टोळ्या या दिल्ली, नोयडा, झारखंड, मध्यप्रदेश येथील आहेत. या टोळ्या त्यांच्या परिसरात असलेल्या खासगी अथवा राष्ट्रीयकृत बँकांत बनावट नावाने खाते उघडतात. एका टोळीकडून फसवणुकीत अनेक बँक खात्यांचा वापर केला जातो.
आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना बँकांचे सहकार्य महत्त्वाचे असते़ बँकांनी तत्काळ सहकार्य केले तर तक्रारदाराचे गुन्हेगारांनी लांबविलेले पैसे परत करता येतात. गेल्या दोन वर्षात सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून बहुतांशी तक्रारदारांना त्यांचे पैसे परत मिळवून दिलेले आहेत. काही बँका मात्र पोलिसांना प्रतिसाद देत नाहीत. यामुळे वारंवार त्यांचा पाठपुरावा करावा लागतो. यातून तपास कामात विलंब होतो, असे नगर येथील सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी सांगितले.