एकाने नव्हे,लोकांनी भगवानगड मोठा केला : महंत नामदेव शास्त्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:00 PM2018-11-06T13:00:45+5:302018-11-06T13:00:50+5:30
गेल्या १५ वर्षांमध्ये कोणा एकाने नव्हे, तर लोकांनी भगवानगड मोठा केला. कोणी वीस लाख तर कोणी ४० लाख गडाला दिले.
बोधेगाव : गेल्या १५ वर्षांमध्ये कोणा एकाने नव्हे, तर लोकांनी भगवानगड मोठा केला. कोणी वीस लाख तर कोणी ४० लाख गडाला दिले. आज गडावरील हिरवळ पाहून काही लोक जळत आहेत. पण मन शुद्ध असणे गरजेचे आहे, असे म्हणत भगवान गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराज यांनी बोधेगाव येथील केदारेश्वर कारखान्याच्या कार्यक्रमातून विरोधकांवर नामोल्लेख टाळून हल्लाबोल केला.
नुसती भाषणे करून गड आपला होत नसतो. त्यासाठी झिजावे लागते. बाबांच्या गादीत मोठी ताकद आहे. ही गादी एखाद्याला घडवू शकते अन् एखाद्याला बिघडवूही शकते,असे म्हणत त्यांनी गड राजकारणापासून दूर ठेवल्यामुळे त्यांना जे विरोध करीत आहेत, त्यांचा नामोल्लेख टाळत टोला लगावला.
भगवानगडाची ताकद मला समजली, म्हणून गड शाबूत आहे. वय झाल्यावर थकल्यासारखे होते. पण कारखाना जायची वेळ आली, तेव्हा प्रताप ढाकणेंना जाग आली आणि भगवानगड जायला लागला, तेव्हा मला जाग आली. चुका होत असतात, पण त्या दुरूस्त करता आल्या पाहिजेत. अर्थात त्यामागे बाबांची पुण्याई होती. म्हणूनच गडाचा कायापालट शक्य होऊन आज गड विकासाकडे वाटचाल करीत उभा आहे. भगवान शिक्षण संस्थेसारखे हाल गडाचे होऊ नये, म्हणून आपण गडावरचे राजकारण बंद केले. ती कोणा एकाची वैयक्तिक मालमत्ता नाही. काही लोक बाबांची ताकद मानायला तयार नाहीत. ज्या घरात आपण राहतो, त्या घरातला घरमालक समजला, तरच घराचे घरपण राहते. आपण पारमार्थिक जगात वावरतो. त्यामुळे आपल्याला व्यावहारिक जग समजत नाही. त्यामुळे काही चुका घडल्या असतील, पण सुज्ञ आणि व्यावहारिक पिढीवर आपला आजही विश्वास आहे.’असेही नामदेवशास्त्री म्हणाले.