उचल फिटली नाही, घरी जायचे कसे? हजारो ऊस तोडणी कारखाना कार्यक्षेत्रात मजूर अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 02:17 PM2020-03-25T14:17:59+5:302020-03-25T14:18:39+5:30
नगर, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, बीड भागातील हजारो ऊसतोडणी कामगार साखर कारखाने सुरु असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकून पडले आहेत. अद्याप उचल फिटली नसल्याने गावी जायचे तरी कसे? या विवंचनेत त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनिल साठे/
शेवगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.२४ ) मंगळवारी रोजी देशातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव या संदर्भात जनतेला संबोधित करतांना 'तुम्ही आहे तिथेच राहा' असे सांगितले आहे. या परिस्थितीत नगर, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, बीड भागातील हजारो ऊसतोडणी कामगारसाखर कारखाने सुरु असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकून पडले आहेत. अद्याप उचल फिटली नसल्याने गावी जायचे तरी कसे? या विवंचनेत त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऊसतोडणी मजुरांनी मागील वर्षी राज्यातील तसेच पर राज्यातील विविध साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणावर उचल घेतली होती. मागील वर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दरम्यान ऊसतोडणीसाठी हजारो कुटुंब विविध कारखान्याच्या कार्यक्षेत्रात स्थलांतरीत झाले होते. पती, पत्नी ऊस तोडायला गेली आहेत. त्यांच्यातील बहुतांश मजुरांचे वृध्द आई, वडील,लहान मुले गावीच आहेत. सध्याच्या परिस्थितीत राज्यासह परराज्यातील अनेक साखर कारखाने सुरू आहे. शेवगाव, पाथर्डी, जामखेड भागातील सुमारे दोन हजार ऊस तोडणी कामगार कारखाना स्थळावर कार्यरत आहेत. सदर कामगारांना जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने त्यांची तिथे गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक गावकरी मजुरांना किराणा सारख्या अत्यावश्यक वस्तू देण्यास व गावात येण्यास मनाई करीत असल्याने कामगारांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
‘लोकमत’शी बोलताना एका मुकादमाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही घेतलेली उचल अद्याप फिटली नाही. येथील स्थानिक लोक आम्हाला किराणा दुकानात येण्यास मज्जाव करीत आहेत. हव्या त्या सुविधा कारखाना प्रशासनाकडून मिळत नाहीत. घेतलेली उचल अंगावर पडल्यावर आम्ही जगायचे कसे? वर्षभर मुलांचे शिक्षण, संसाराचा खर्च कसा भागणार. आम्हाला गावी यायचे म्हटले तर साधने मिळत नसल्याचे सांगितले.
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर साखर कारखाना स्थळावर पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील तब्बल ८० बैलगाडी आहे. इथं आम्ही २०० ते ३०० लोक आहोत. आम्हाला येथील स्थानिक लोक साधा किराणा घेण्यासाठी गावात येऊ देत नाही. कारखान्याकडून कामाची घेतलेली उचल अद्याप फिटली नाही. त्यात आमच्या जीविताला कोरोना रोगाचा संसगार्चा धोका वाढला आहे. प्रचंड भीती वाटते. पण घेतलेल्या उचलीचे करणार तरी काय..?, असेही ऊसतोडणी मजुरांसह मुकादमाने सांगितले.